केम्पेगौडा यांच्या पुतळ्याच्या अनाव्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबरला कर्नाटकात येत आहेत. त्यांच्याहस्ते 3 महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज रविवारी त्यांच्या बेंगळूर येथील आरटीनगरातील निवासस्थानाजवळ जनतेची निवेदने स्वीकारली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. बोम्मई म्हणाले, पंतप्रधान मोदी 11 नोव्हेंबर रोजी “म्हैसूर ते चेन्नई वंदे भारत” रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी कर्नाटकात येत आहेत. बंगळुरूच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या 2.5 लाख पर्यटक क्षमतेच्या विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन करतील. त्याचप्रमाणे नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करतील.

राज्याच्या उर्वरित भागात उद्यापासून भाजपची जनसंकल्प यात्रा सुरू होणार आहे असे सांगून बोम्मई म्हणाले, बेळगाव, उडुपी, गदग हावेरी येथे तीन दिवस जनसंकल्प यात्रा चालणार आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ही यात्रा होणार आहे. याला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. आमच्या पुढील विजयासाठी हे उत्साहवर्धक आहे. गेल्या वेळी ही यात्रा हैदराबाद कर्नाटकात झाली होती. आता मुंबई कर्नाटकात होणार आहे. गुलबर्ग्याच्या धर्तीवर 20 नोव्हेंबरला बळ्ळारी येथे एसटी समुदायाचा भव्य मेळावा होणार आहे. 30 नोव्हेंबरला म्हैसूरमध्ये एससी परिषदही होणार आहे.
खासगी कंपन्यांना परवाना देण्यामधील गैरप्रकार झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. याची चौकशी केली जाईल. रमेश जारकीहोळी यांनी आपल्या क्षेत्रासंदर्भात भेट घेतल्याचे सांगितले. रेणुकाचार्य यांच्या भावाच्या मुलाच्या मृत्यूच्या योग्य तपासाबाबत निर्देश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.


Recent Comments