काँग्रेसवर देश उद्ध्वस्त केल्याचा वारंवार आरोप करणारा भाजप मतांसाठी स्वार्थाचे राजकारण करत आहे. काँग्रेस नेहमीच सत्याच्या मार्गावर होती आणि आहे असा घणाघात एआयसीसीचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समिती अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर पहिल्यांदाच राज्यात आलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचा आज, रविवारी बेंगळुरात कर्नाटक काँग्रेस कमिटीतर्फे सर्वोदय अधिवेशनात सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, बंगळुरमध्ये सर्वप्रथम वकील म्हणून मी कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी मला प्रोत्साहन दिले. इंदिरा गांधी याच काँग्रेसला मजबूत करतील असा विश्वास छलपती राव यांनी व्यक्त केला होता. देवराज अरसू यांनीही आम्हाला काँग्रेस बांधणीसाठी प्रोत्साहन दिले. लोकांची सेवा करणे हाच उद्देश असावा. सत्तेसाठी कोणत्याही पक्षात सामील होऊ नका तर त्या पक्षाची तत्त्वे जाणून घ्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू करा. सत्ता मिळत नाही म्हणून काही लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. मात्र पक्षाची विचारधारा राबवण्यासाठी आपण पक्षात सहभागी झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या प्रत्येक कामात अडथळे आणले जात आहेत. काँग्रेसने देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप भाजपवाले वारंवार करतात. पण काँग्रेस सत्याच्या मार्गावर चालत आहे. भाजप मतांसाठी जगत आहे. ते जात आणि धर्म यांच्या बळावर लोकांना लढवत आहेत. दलित मुलींवर बलात्कार झाले, पण पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले नाही. केवळ मंदिरांचे उंबरठे झिजवून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. जीडीपी, बेरोजगारी, महागाई याकडे लक्ष न देता काँग्रेसला दोष देण्यात ते वेळ घालवत आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना मिळालेल्या पाठिंब्याने भाजप हादरला असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, केएच मुनिअप्पा, काँग्रेस राज्य प्रचार समिती अध्यक्ष एम. बी. पाटील, रामलिंगारेड्डी आदी उपस्थित होते.


Recent Comments