Belagavi

परिवहन कर्मचाऱ्यांची सरकारविरोधात पुन्हा लढ्याची तयारी

Share

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चार महामंडळातील कर्मचाऱ्यांना सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन देण्यात यावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने बेळगाव येथे सायकल रॅली काढण्यात आली.

परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक मिळावी, ६ व्या वेतन आयोगानुसार वेतनाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर सायकल रॅली काढली. यावेळी हातात फलक घेऊन आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
शासन त्यांच्या अखत्यारीतील इतर महामंडळे, विभाग आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सर्व सुविधा पुरवत आहे. मात्र केवळ परिवहन कर्मचाऱ्यांशी भेदभाव करण्यात येत असून यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार तुटपुंजा आहे. सदर कर्मचाऱ्यांना दडपणाखाली काम करावे लागत असून यामुळे अनेक आजारांनाही तोंड द्यावे लागत आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्य सुविधा मिळत नाहीत. डिसेंबर २०२० मध्ये विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला यावेळी सरकारने लेखी आश्वासन देत, ३ महिन्यांत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर संप मागे घेण्यात आला. आता मुदत संपूनही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. परिवहन संपादरम्यान हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर खोटे पोलिस गुन्हे दाखल करण्यात आले. याविरोधात आता पुन्हा आपली मागणी पूर्ण करण्यासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी सायकल रॅली काढून आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकार दरबारी निवेदन दिले.

यावेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर बोलताना म्हणाले, १० ऑक्टोबर पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत असून होस्पेट, कोप्पळ , यादगिरी, रायचूर, बिदर, कलबुर्गी, विजापूरमार्गे सदर रॅली बेळगावला पोहोचली आहे. आमचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी महेश शीगीहळ्ळी बोलताना म्हणाले, ५० ते ६० दिवस आंतरराज्य परिवहन कर्मचारी सायकल रॅलीत सहभाग घेणार असून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

२०२० साली परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे परिवहन खात्याला मोठा फटका सोसावा लागला होता. यानंतर अनेक कर्मचाऱ्यांवर दडपण आणून सदर संप मागे घ्यावा लागला होता. अद्यापही सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने आता पुन्हा एकदा नव्या लढ्यासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी तयारी सुरु केली आहे. हा संघर्ष सुरु होण्यापूर्वी सरकार कोणते पाऊल उचलेल कि पुन्हा हा संघर्ष वाढेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags:

ksrtc-workers-protest/