संपूर्ण बेळगाव तालुका व परिसर भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. बेळगाव बासमती तांदळाच्या जातीसाठी प्रसिद्ध आहे आणि या तांदळाची खाण म्हणून ओळखले जाते. मात्र लहरी हवामान, मजुरांचा अभाव, बियाणे आणि कीटकनाशकांचे वाढते दर आदींमुळे भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
होय, बेळगावच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात धान्याचे पीक घेतले जाते. त्यातही भात लागवडीसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. बेळगाव तालुक्यात प्रामुख्याने इंद्रायणी, बासमती आणि किटाळा जातीचे भात पीक घेतले जाते. तालुक्यातील कर्ले, किणये आदी परिसरातील शिवारात यंदा भात चांगले पोसवले असून दरही चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र सर्व काही भात खरेदी करणाऱ्या दलालांवर अवलंबून आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना कर्ले येथील शेतकरी विनायक रावजी पाटील यांनी सांगितले की, यंदा कर्ले भागात शेतकऱ्यांनी प्रामुख्याने इंद्रायणी, बासमती भाताची पेरणी केली आहे. अन्य ठिकाणी पावसाने शेतीचे नुकसान केले असले तरी या भागातील शेती ही जास्तकरून पावसावरच अवलंबून असल्याने येथे फारसा फटका बसलेला नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांकडे कूपनलिका आणि विहिरी आहेत. मात्र हेस्कॉमच्या कारभारामुळे पिकांना वेळेत पाणी देणे जमत नाही. पूर्वी दिवसातून विशिष्ट वेळी ६-७ तास अखंड वीज पुरवठा केला जाई. मात्र आता तसा अखंड वीजपुरवठा केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. यंदा भाताला प्रतिक्विंटल 4 ते 4. 5 हजार रुपये दर मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बियाणे, खते, कीटनाशकांचे आणि मजुरीचे वाढलेले दर पाहता शेती करणे कठीण बनत चालले आहे. तशातच शेतकऱ्यांची मुले शेतीकडे वळेनाशी झाल्याने शेती हा आमचा पारंपरिक व्यवसाय हातून निसटतो काय अशी भीती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एका ज्येष्ठ शेतकरी महिलेने मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याची माहिती दिली. पूर्वी आम्ही दिवसाला 200 रुपये मजुरी देत असू. पण आता 250 ते 300 रुपये मजुरी द्यावी लागत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत 300 ते 350 रुपये मजुरी मिळत असल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर तिकडे वळत असल्याने सामान्य शेतकऱ्याला एवढी मजुरी देता येत नसल्याने तो अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.
वैविध्यानुसार बासमतीची सध्याची बाजारातील किंमत 4,000 ते 5,000 रुपये आहे. मात्र दलाल लोक शेतकऱ्यांकडून 2500-3000 हजारांना खरेदी करतात. हा अल्प भाव शेतकऱ्याला परवडणारा नाही. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे, एकीकडे शेतमजुरांचा तुटवडा असल्याने मजुरीत झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे, तर दुसरीकडे शेतमालाची वाढ, खतांच्या किमती, शेती उपकरणांच्या किमतीत झालेली वाढ, तसेच शेतमजुरी हे शेतकऱ्यांच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. मायबाप सरकारही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळेवर धाव घेत नाही. केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतरच सरकार जागे होऊन भरपाई देऊन मोकळे होते. शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही हीच शेतकऱ्यांची कैफियत आहे.
Recent Comments