Belagavi

महिला विद्यालय आणि किलबिल शाळेतील विद्यार्थ्यांची कार्तिकी दिंडी!

Share

मुलांना वारकरी संप्रदायाच्या परंपरेची माहिती व्हावी, आणि आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे महत्व कळावे यासाठी बेळगावमधील महिला विद्यालय मराठी माध्यम आणि किलबिल बालमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दिंडी काढण्यात आली.

बेळगावमधील महिला विद्यालय मराठी माध्यम शाळा आणि किलबिल बाल मंदिर बालवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आज शहरात दिंडीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा जपली. पारंपारिक वेशभूषेतील बालचमूंनी भक्तिभावाने दिंडीमध्ये सहभाग घेतला. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील या दिंडीला सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात, भजनी ठेका धरत विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.

याबाबत महिला विद्यालयातील शिक्षिका प्रिया मोहिते यांनी सांगितले, गेल्या १५ वर्षांपासून शाळा दिंडी यात्रा आयोजित करत आहे. दरवर्षी आयोजिल्या जाणाऱ्या या उपक्रमात मुलांना वारकरी संप्रदायासह आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात येते. यामध्ये बालवाडी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून महिला विद्यालयासह किलबिल बालमंदिर मधील विद्यार्थ्यांचाही या दिंडीत सहभाग असल्याचे त्या म्हणाल्या.

आधुनिक काळात आपल्या परंपरा लोप पावत चालल्या आहेत. आपल्या संस्कृतीचे जतन करून आपल्या परंपरांविषयी आजच्या पिढीपर्यंत याची माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजिण्यात आलेल्या महिला विद्यालय आणि किलबिल बाल मंदिर शाळेचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असा आहे.

Tags:

kilbil balmandir kartik ekadashi pandharpur wari