Belagavi

केएलएसतर्फे “फेस्ट क्रेडेन्स-२०२२” आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन

Share

बेळगावमधील केएलएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

के एल एस इंग्लिश मीडियम हायस्कूल, बेळगावच्या सभागृहात दोन दिवसीय आंतरशालेय स्तरावरील “फेस्ट क्रेडेन्स-२०२२” अंतर्गत स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी भाषण, गायन, नृत्य, चित्रकला, उद्योजकता, स्टँडअप कॉमेडीसह इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सरकारी बीएड महाविद्यालयाचे सहसंचालक प्राचार्य मुरुगेंद्र सिंदुर म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच संस्कृतीची ओळख असणेही खूप गरजेचे आहे. केवळ शिक्षण घेणे इतकेच महत्त्वाचे नसून त्या शिक्षणाने इतरांना मदत होईल असे शिक्षण घेणेही गरजेचे आहे. अलीकडे शिक्षणात बरेच बदल झाले असून यातील सर्व बदल आपण स्वीकारले पाहिजे.

केएलएस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी मुतालिक देसाई यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले, केएलएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही सर्व शालेय मुलांसाठी, त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. दरवर्षी आम्ही एक स्पर्धा आयोजित करतो. मागील वर्षी या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ११ शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षा असल्याने कमी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघाला जनरल चॅम्पियनशिपचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमात केएलएस प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. के एल एस संस्थेच्या वतीने तयार करून देण्यात आलेल्या व्यासपीठामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, हि बाब कौतुकास्पद आहे.

Tags:

belgaum kls fest kredenz 2022