बेळगाववर विशेष भर द्यायला हवा, केवळ विधानसौध बांधून बेळगावचा विकास होणार नाही, बेळगावमध्ये रोजगार निर्मितीसाठी सरकारने मोठे उद्योग आणणे गरजेचे आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया आपल्याच सरकार विरोधात दक्षिण मतदार संघाचे आ. अभय पाटील यांनी व्यक्त केली.
बेळगावातील सुवर्णसौधजवळील हेलिपॅडवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील यांनी गुंतवणूकदारांच्या परिषदेविषयी माहिती दिली. या संमेलनाचे दोन बाजूंनी विशेष झोन केले जातील, असे त्यांनी सांगितले. बेळगाव स्वातंत्र्य पूर्व काळापासून विभागीय मुख्यालय असणारे ठिकाण आहे. तसेच उद्योगांसाठी अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. पूर्वी मुंबई हे कर्नाटक राज्यातील महत्त्वाचे शहर होते. मात्र कालांतराने येथील अनेक समस्या निर्माण करणारे उद्योग इतर जिल्ह्यांमध्ये व राज्यात गेले आहेत. मात्र आज भाजपचे सरकार आल्यानंतर अनेक उद्योग बेळगावात येत आहेत. यामुळे बेळगाव वर विशेष भर द्यायला हवा, केवळ विधानसौध बांधून बेळगावचा विकास होणार नाही, बेळगावमध्ये रोजगार निर्मितीसाठी सरकारने मोठे उद्योग आणणे गरजेचे आहे असे आमदारांनी सरकारला सुचविले.
कर्नाटकातील फक्त दोन किंवा तीन शहरे म्हणजे संपूर्ण राज्य नाही. स्पेशल झोन दोन बाजूंनी केले जाईल अशी हमी दिल्याप्रमाणे बेळगावातही स्पेशल झोन निर्माण केले जावे, बेळगावला वगळून चालणार नाही. बेळगावमध्ये भाजपाची ताकद अधिक आहे, आणि हि बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.
बेळगावात जयदेव हॉस्पिटल सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता. बेळगावमध्ये असलेले कॅन्सर हॉस्पिटलच मुख्यमंत्र्यांनी सुरु केले. गुंतवणूकदारांची परिषद यशस्वी झाली. मात्र बेळगाव जिल्ह्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.
सीमावर्ती भाग म्हणून परिचित असलेल्या बेळगाव जिल्ह्याचा विकास गेल्या ६० वर्षांपासून खुंटला आहे. भाजप सरकार काळातच या जिल्ह्यात अनेक विकासकामे राबविण्यात आली आहेत. भाजप सरकार काळात जगदीश शेट्टर, सदानंद गौडा, आणि बसवराज बोम्मई यांच्या माध्यमातून बेळगावच्या विकासासाठी अनुदान मंजूर झाले आणि यामुळे बेळगावचा विकास झाला, इतर पक्षांच्या सरकार काळात एक पैसाही बेळगावच्या विकासासाठी देण्यात आला नसल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.


Recent Comments