मी मोळकालकूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तुमच्यात ताकद असेल तर आगामी निवडणूक बदामी मतदारसंघातून लढवा असे खुले आव्हान मंत्री बी. श्रीरामुलू यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिले.
मंत्री बी. श्रीरामुलू यांनी गुरुवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोळकालकूर मतदारसंघातील आपल्या लढतीबद्दल सांगितले. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहेत ना? त्यामुळे बदामीतूनच त्यांनी लढत द्यावी, बदामीतील लोक तुम्हाला काळे फासतील. आधी त्यांनी त्यांचा मतदारसंघ जाहीर करावा. जे लोक मतदारसंघ नसताना परदेशी म्हणून फिरत आहेत त्यांना मी उत्तर देणार नाही असा पलटवार श्रीरामुलू यांनी केला.
माझ्याबद्दल लोक निर्णय घेतील. मी तुमच्यासारखे राजकारण करत आलेलो नाही. सिद्धरामय्या जेडीएसमध्ये होते आणि त्यांनी देवेगौडा यांच्यावर वार केला. डी. के. शिवकुमार आणि परमेश्वर यांनादेखील त्यांनी संपविले. त्यांनी आता माझ्या निष्ठेबद्दल बोलणे हास्यास्पद आहे. चामुंडेश्वरी मतदारसंघात तुम्हाला तुमच्याच मतदारसंघातून लोकांनी पराभूत करून घरी पाठवले, हे लक्षात ठेवा. मी 30 वर्षांपासून राजकारणात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मला आता जुनी बस खरेदी करण्याबद्दल माहिती नाही. काही बसेस वापरता येतात. उत्तर कर्नाटक परिवहन महामंडळ आणि बीएमटीसी यांच्यात कोणताही भेदभाव करत नाही. महानगरामुळे काही बदल केले जात आहेत असे श्रीरामुलू यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, हस्तकला कौशल्य निगमचे अध्यक्ष मारुती अष्टगी, मुरुगेंद्र गौडा पाटील, दादागौडा बिरादार आदी उपस्थित होते.


Recent Comments