कृषी आणि सहकारी संस्थांच्या सदस्यांना आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी यशस्विनी आरोग्य योजना १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली असून १ जानेवारी २०२३ पासून कॅशलेस वैद्यकीय सुविधेचा लाभ घेता येईल. या योजनेसाठी नोंदणी सुरू झाली असून नावनोंदणी करण्याचे आवाहन खानापूरचे माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी केले आहे.

खानापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद पाटील म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्व सहकारी संस्थांना पत्र पाठविण्यात आले आहे.. २००३ मध्ये कर्नाटक सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाखांपर्यंतची कॅशलेस वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सुरू झाल्यानंतर गेली तीन वर्षे यशस्विनी योजना रखडली होती. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना यशस्विनी योजनेच्या पुनरुज्जीवनाची घोषणा केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना सर्व सहकारी पतसंस्था, सौहार्द पतसंस्था, आंतरराज्य सहकारी पतसंस्था, कृषी सहकारी बँक, नागरी सहकारी पतसंस्था तसेच बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, अर्बन सहकारी पतसंस्था – बँक यांच्यामार्फत ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या बचत गटांच्या सदस्यांना लागू आहे. कृषी पत्तीन संस्थेच्या माध्यमातून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बहुतांश शेतकरी हे कृषी संस्था व दूध संस्थेचे सभासद आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळतो. एका कुटुंबातील ४ सदस्यांसाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आणि चारपेक्षा जास्त सदस्य असल्यास प्रत्येकी १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. यशस्विनीला पूर्वी सुविधा असलेल्या सर्व दवाखान्यांमध्ये उपचार आणि वैद्यकीय सुविधा मिळू शकतात, अशी महत्वपूर्ण माहिती आमदारांनी दिली.
विविध सहकारी आणि शेतकरी संघटनांचे सभासद असलेले ३० हजारांहून अधिक शेतकरी, केएमएफ चे १४ हजार सभासद आणि स्वयंसहाय्यता संस्थांचे १८४२ सभासद या योजनेचा लाभ घेणार आहेत. त्यासाठी त्यांना नूतनीकरण शुल्क भरावे लागेल आणि त्यांचे नाव नव्याने नोंदवावे लागेल. कान, नाक, डोळा, घसा, यकृत, फुफ्फुस, हृदय, हाडे यासह गंभीर आजारांवर पाच लाखांपर्यंत उपचार मोफत होणार आहेत. आधारकार्ड, दोन छायाचित्रे, रेशनकार्ड झेरॉक्ससह संबंधित पीकेपीएस कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी आमदार अरविंद पाटील यांनी केले आहे.
यावेळी तालुका पंचायत अधिकारी यरगट्टी, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.


Recent Comments