सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याविरोधात आज कॅम्प वासियांनी कॅंटोन्मेंट बोर्ड विरोधात संताप व्यक्त करत खानापूर रोड रोखून आंदोलन केले.
कॅंटोन्मेंट हद्दीत येणाऱ्या कॅम्प परिसरात २० दिवसातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या परिसरात पथदीपांची सोय नाही कि रस्त्यांची अवस्था नीट नाही! या परिसराकडे कॅंटोन्मेंट बोर्डच्या झालेल्या दुर्लक्षामुळे आज कॅम्प वासियांनी खानापूर रोड रोखून आंदोलन केले.. कॅंटोन्मेंट अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीविरोधात संताप व्यक्त केला.
कॅम्प परिसरातील समस्या सोडविण्याच्या मागणीस्तव गुरुवारी सकाळी कॅंटोन्मेंट सीईओना कॅम्प वासियांनी निवेदन सादर केले. या परिसराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीला देण्यात आली असून या भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी सदर कंपनीला ताकीद देण्यात आल्याचे कॅंटोन्मेंट सीईओनी सांगितले. लवकरच हि समस्यां मार्गी लागेल, यामुळे सदर आंदोलन मागे घेण्याची विनंती यावेळी कॅंटोन्मेंट सीईओनी कॅम्प येथील रहिवाशांना केली.

याबाबत येथील रहिवासी सविता यांनी आपली मराठीला प्रतिक्रिया देताना सांगितले, गेल्या एक वर्षांपासून आपल्या घराबाजूला असलेल्या गटारीची स्वच्छता करण्यात आली नाही. गटारींची स्वच्छता करण्यासाठी कामगार नसल्याचे सांगण्यात येत असून या भागात पाणी, पथदीप, रस्त्यांची सोय योग्य पद्धतीने करून देण्यात आली नाही. पाणी बिल, वीजबिल वेळच्या वेळी भरूनही अशा समस्या उद्भवत असतील, तर अशा परिस्थितीत या परिसरात आपण कसे राहायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या भागात पिण्याचे पाणी देखील योग्य वेळेत न पुरविण्यात येत असल्याची तक्रार आणखी एका रहिवाशाने केली. पिण्याचे पाणी योग्यपद्धतीने पुरविण्यात न आल्याने बोअरवेलचे पाणी प्यावे लागत असल्याचे या रहिवाशाने सांगितले. २० दिवसातून एकदा पिण्याचे पाणी पुरविले जाते मात्र तेही अत्यंत कमी वेळेसाठी सोडण्यात आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा करणेही शक्य होत नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली.
आंदोलन स्थळी एसीपी चंद्रप्पा यांनी भेट देऊन कॅम्प परिसरातील रहिवाशांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या आंदोलकांना कॅंटोन्मेंट कार्यालयात बोलावून अधिकाऱ्यांसमवेत बैठक घडवून दिली. कॅंटोन्मेंट अधिकाऱ्यांनी चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली असती तर अशी वेळच उद्भवली नसती, अशी प्रतिक्रियाही यावेळी कॅम्प मधील नागरिकांनी व्यक्त केली. या साऱ्या परिस्थितीचा विचार करता कॅम्प परिसरातील रहिवाशांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी कॅंटोन्मेंट अधिकाऱ्यांनी तातडीने पार पाडणे अत्यावश्यक आहे.


Recent Comments