बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्याच्या सीमेवरील गावात सर्वभाषिकांनी गुण्यागोविंदाने कर्नाटक राज्योत्सव साजरा केला.

गेली अनेक वर्षे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाप्रश्नावरून संघर्ष सुरू आहे, मात्र काल झालेल्या कन्नड राज्योत्सवात मराठी भाषिकांनीही सहभाग नोंदवून आपले कन्नडीगांसोबत जवळचे नाते आहे हे दाखवून दिले
सोलापूर, हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील कर्नाटकातील सीमावर्ती गाव, या गावात दरवर्षी विशेष राज्योत्सव साजरा केला जातो. सकाळी गावातील वडीलधारी मंडळी, गावातील विविध शाळकरी मुले आणि कन्नड समर्थक विविध संघटनांचे कार्यकर्त्यांनी उत्साहात राज्योत्सवाची मिरवणूक काढली. सजवलेल्या हत्तीवरील अंबारीत भुवनेश्वरी देवीची वेशभूषा केलेल्या मुलीला बसवून मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील मुलांनी कन्नडनाडू गीत गायले आणि संस्कृत रूपकांचे चित्रण केले. , तर डीजेच्या तालावर तरुणाई नाचत होती.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष अशोक मस्ती म्हणाले की, सीमावर्ती भागातील सोलापूर गावात कन्नड, मराठी आणि उर्दू भाषिकांकडून राज्योत्सव उत्साहात साजरा केला जातो. आमच्यात कसले भेद नाहीत. म्हणून हत्तीवरून अंबारीत मिरवणूक काढून राज्योत्सव साजरा करत आहोत. गावातील मराठी भाषिक ग्रामपंचायत सदस्य फत्तेसिंग पाटील यांनी सांगितले की, कर्नाटक राज्याचा सीमावर्ती भाग असलेल्या सोलापूर गावात दरवर्षी आम्ही कर्नाटक राज्योत्सव साजरा करतो.
यावेळी कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष अनिल भुसन्नवरा, संकेश्वर करवे उपाध्यक्ष पप्पू पाटील, दुरुदुंडी भागी, ग्रामपंचायत विकास अधिकारी पी. आर. नेर्ली, राजू कोरी, अनिल खनाई, तानाजी शेलाल, रावसाहेब कुलकर्णी, विजय तोडकर तसेच तुक्काईवाडी, शिंदेवाडी, सोलापूर गावातील शाळेतील मुले, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सीमेवरील सोलापूर गावात कन्नड भवन बांधण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक शिकंदर रणमल्ली यांनी केली.


Recent Comments