Belagavi

राज्योत्सव मिरवणुकीचा धिंगाणा १२ तास !; डॉल्बीच्या दणदणाटामुळे बेळगावकर हैराण

Share

गेल्या ३ वर्षात कोरोनामुळे थंडावलेला राज्योत्सव मिरवणुकीचा कहर काल बेळगावकरांनी अनुभवला. तब्बल १२ तास ताल ना सूर, केवळ धुडघूस आणि धांगडधिंगा घालत बेळगावकरांना डॉल्बीच्या दणदणाटाने हैराण करून सोडले.

बेळगावमध्ये साजरा झालेला ६७ वा राज्योत्सव भव्य करण्याच्या नादात आवाजाची मर्यादा न पाळता संपूर्ण शहराला वेठीला धरून पार पडला. बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या कन्नड भाषिकांनी संपूर्ण शहराची व्यवस्था या मिरवणुकीमुळे अस्ताव्यस्त केली. राणी चन्नम्मा चौक सकाळी ११ पासून चारीबाजूनी ब्लॉक केल्याने कोणत्याही दिशेला जाणाऱ्या वाहन चालकांना नाहक बेळगावच्या बाहेरील बाजूने फेऱ्या माराव्या लागल्या.

प्रत्येक गल्लीमध्ये डॉल्बी, चित्ररथ, चित्ररथसमोर हिडीस नृत्य करणारे – तरुण – तरुणी, कोणत्याच गोष्टीचा ताळमेळ नसलेली मिरवणूक, पुरणपोळीच्या जेवणासाठी उडालेली झुंबड आणि डॉल्बीचा मर्यादेपलीकडे असणारा आवाज यामुळे बेळगावकरांना दिवसभर कानठळ्या झेलाव्या लागल्या.

भव्य आणि दिव्य करण्याच्या नादात शहराचे सौंदर्य आणि मिरवणुकीतील आकर्षण हे संपूर्णपणे फोल ठरल्याचे चित्र काल झालेल्या राज्योत्सव मिरवणुकीत दिसून आले. या मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असूनही प्रशासनाने हातावर हात ठेवून गप्प बसणेच पसंत केले.

Tags:

belagavi-kannada-rajyotsava/