Belagavi

बेळगाव आमच्या हक्काचे ! म. ए. समितीची विराट मूक सायकल फेरी

Share

महाराष्ट्रात सामील होण्याच्या अमीट आणि असीम इच्छेने बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांनी आज काळा दिन आचरण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या काळ्या दिनाच्या आवाहनाला मराठीची भाषिकांनी भरभरून प्रचंड प्रतिसाद देत ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नाही तो जेल में’ अशा गगनभेदी घोषणा देत बेळगावात भव्य सायकल फेरी काढून महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त केलाय.


भाषिक प्रांतरचनेवेळी मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ बेळगावात १९६३पासून १ नोव्हेंबरला केंद्र सरकारच्या निषेधार्थ काळा दिन पाळण्यात येतो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे त्यावर मर्यादा आली होती. मात्र आता कोरोना दूर झाल्याने यंदा भव्य सायकल फेरी काढून काळा दिन पाळण्यात येतोय.
बेळगावातील महाद्वार रोडवरील छत्रपती संभाजी उद्यानापासून आज सकाळी ९ च्या सुमारास मराठी भाषिकांनी भव्य मूक सायकल फेरीला प्रारंभ झालाय. काळे कपडे घालून, हातात, डोक्याला, दंडावर काळ्या फिती बांधून असंख्य आबालवृद्ध आणि महिलांनी या सायकल फेरीत सहभाग घेतला आहे.

सीमाप्रश्नाच्या लढ्यात तिसरी पिढीही सामील झाल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले. पणजोबा, आजोबासोबत नातवंडेही सायकल फेरीत उत्साहाने सहभागी झाली होती. महाराष्ट्रात जाण्याची असीम इच्छा आणि दुर्दम्य आशावाद सायकल फेरीत सहभागी झालेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सुमारे २ ते ३ किमी लांबीची ही सायकलफेरी प्रामुख्याने शहराच्या दक्षिण भागात संचारली.


‘बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बीदर, भालकी, संतपूर, औरादसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतं देत नाही, अरे घेतल्याशिवाय रहात नाही’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नाही तो जेल में’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

Tags:

belgaum black day rally 2022