Kagawad

महावीर पडनाड यांनी देणगीदाखल दिल्या २५ लाखांच्या भेटवस्तू

Share

कलियुगात स्वार्थाशिवाय दान धर्म करणाऱ्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. संकोनट्टी या गावातील आधुनिक कर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महावीर पडनाड हे हि त्यापैकीच एक. सातत्याने अडीअडचणीत असलेल्यांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या महावीर पडनाड यांनी नुकतेच २५ लाख रुपयांच्या भेटवस्तू देऊन आपल्या उदार वृत्तीचे दर्शन घडविले आहे.

संकोनट्टी या गावातील महावीर पडनाड यांनी गेल्या २४ वर्षांपासून हा उपक्रम सुरु ठेवला आहे. यंदा त्यांनी २५ लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या वस्तू यासह संसारोपयोगी साहित्य दान केले आहे. आधुनिक कर्ण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महावीर पडनाड यांच्या या उपक्रमामुळे या परिसरात त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

दिवाळीच्या निमित्ताने महावीर पडनाड यांनी त्यांचे वडील दिवंगत बाबुराव पडनाड यांच्या स्मरणार्थ या भेटवस्तू दिल्या आहेत. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार शहाजहान डोंगरगाव यांनी महावीर पडनाड यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता दानधर्म करण्याची वृत्ती जोपासणारे महावीर पडनाड यांच्या उदार स्वभावाचे अथणी येथील वकील के एल कुंदरगी यांनीही कौतुक केले.

जन्मा नंतर मृत्यू हा अटळ आहे. मात्र जन्म मरणाच्या या चक्रात आपण जे कार्य करतो ते प्रत्येकाच्या स्मरणात राहते. आधुनिक युगातील कर्ण म्हणून दानशूर वृत्ती जोपासणाऱ्या महावीर पडनाड यांच्या कार्याचे ज्येष्ठ नेते एस के बुटाळे यांनीही कौतुक केले.

महावीर पडनाड आणि त्यांच्या पत्नी कल्पना पडनाड यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, कि आपल्या वडिलांच्या प्रेरणेतून आपल्याला हि दानधर्माची वृत्ती मिळाली आहे. आपला आनंद दुसऱ्यासोबत साजरा करणे, दुसऱ्याला आनंद देणे हे सर्व गुण आपल्या वडिलांकडे होते. त्यांच्यानंतर त्यांच्या या सर्व गुणांचे आपण पालन करत त्यांच्या तत्वानुसार गेल्या २४ वर्षांपासून असा उपक्रम राबवित असल्याचे उभयतांनी सांगितले.

यावेळी जैन समाजातील १०८ पुरोहितांना मानधन, अथणी वकील संघाला व्हिडीओ कॅमेरा, शाळांना संगणक, मुलींना सोन्या-चांदीचे दागिने, साड्या, चुडीदार यासह विविध जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी वकील सी बी पडनाड, के एल कुंदरगी, रवी बनजवाड, एस के बुटाळे, पीएसआय चेतन आसक्ती, जक्काप्पा करीबसप्पगोळ, अमर दुर्गान्नावर, कल्पना पडनाड, रेखा पाटील, सुभाष हुब्बळ्ळी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हास्यकलाकार विजय हुद्दार, आनंद नाईक, संजू बडिगेर यांचा कार्यक्रम पार पडला.

Tags:

mahaveer padnad diwali offers