जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या त्वचारोगाने बेळगावमध्ये थैमान घातले आहे. हा रोग निवारण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर पाऊले उचलून जनावरांचा जीव वाचविण्यासाठी औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौड मोदगी यांनी केली आहे.
राज्यातील अनेक तालुक्यातील जनावरे त्वचारोगाने त्रस्त झाली आहेत. या रोगामुळे अनेक जनावरांचा बळी जात असून यामुळे शेतकरी वर्गही चिंताग्रस्त झाला आहे. या जनावरांना तातडीने औषध पुरविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सिदगौडा मोदगी म्हणाले, जनावरांमधील त्वचारोगामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग त्रस्त आहे. या रोगामुळे दररोज ४ ते १० जनावरांचा बळी जात आहे. याबाबत जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र निवेदनावर कोणताही प्रतिसाद आपल्याला मिळाला नाही. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून कॉर्पोरेट कंपन्यांच्या पायाशी जाऊन सरकार काम करत आहे. मात्र शेतकऱ्यांविषयी सरकार कोणतीही जबाबदारी पार पाडत नसल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.
बेळगाव जिल्ह्यात केवळ ८०० जनावरांचा बळी गेल्याचे सांगत अधिकारी सरकारला चुकीची माहिती देत आहे. येरझरवी या एकाच गावात सुमारे ७८ जनावरांचा बळी गेला आहे. यासाठी केवळ २० ते ३० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल, असे सांगितले आहे. मात्र सरकार लस का उपलब्ध करून देत नाही? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. लस पुरविली असती तर इतके पैसे खर्च करूनही जनावरांचा बळी गेला असता का? सरकार जनसंकल्प यात्रेचे आयोजन करत आहे. मात्र शेतकऱ्यांचा विचार हे सरकार करत नसल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांना ७५ हजार ते १ लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी बेळगावमध्ये होऊ घातलेल्या रिंग रोड निर्मितीलाही विरोध दर्शविण्यात आला. पिकाऊ जमिनी कोणत्याही कारणास्तव संपादित करू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थित आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या आंदोलनात भारतीय कृषक समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
Recent Comments