Belagavi

शिवछत्रपती पायी ज्योतयात्रेचे बिजगर्णीत जल्लोषात भव्य स्वागत

Share

स्वराज्याची राजधानी रायगड येथून आणलेल्या पायी शिवज्योत यात्रेचे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात आज जल्लोषात आगमन झाले. यावेळी शिवरायांच्या जयघोषाच्या गगनभेदी घोषणा देत फटाक्यांच्या आतिषबाजीने ज्योतयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

होय, बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात आज संपूर्ण शिवमय वातावरण निर्माण झाले होते. निमित्त होते, पायी शिवज्योत यात्रेच्या आगमनाचे. गणेश युवक मंडळ शिवाजी चौक आणि ग्रामस्थांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. अगदी लहान मुलांपासून ते ४०-५० वर्षाच्या माणसांपर्यंत सर्व रायगड ज्योत आणण्यासाठी गेला होता. विशेष म्हणजे कडाक्याची थंडी अंगावर झेलत युवकानी भवानी मातेची प्रज्वलित केलेली ज्योत गावात आणली. सर्व ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने ज्योतीचे स्वागत केले.

या शिवज्योतीच्या साक्षीने संपूर्ण मराठा समाज अखंड रहावा, एकत्र यावा, आपली भाषा आपले राष्ट्र अखंड राहिले पाहिजे. येणाऱ्या काळात देश, धर्म आणि जातीच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घ्याव लागेल, यासाठी आता पासूनच संघटीत व्हावे आवाहन विनय कदम यांनी केले.

यावेळी सुवासिनींनी पंचारती ओवाळून तर शिवभक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करत ज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत केले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “जोतिबाच्या नावानं चांगभलं” ! अशा जयघोषाने संपूर्ण बिजगर्णी गाव दुमदुमले. शिवछत्रपती ज्योतीचे आगमन येथील प्रमुख शिवाजी चौकात आल्यानंतर भाजप माजी ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनय कदम, निंगाप्पा जाधव यांच्या हस्ते हार घालून ज्योतीचे स्वागत करण्यात आले. या ज्योत मिरवणुकीला चालना मंगेश मोरे यांच्या हस्ते देण्यात आले. शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन यल्लाप्पा मोटर व ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा जाधव, शीतल तारिहाळकर आदी उपस्थीत होते.

गावातील मुख्य गल्लीतुन शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सुवासिनींनी पंचारती ओवाळून औक्षण केले. “दुर्गा भवानी माता की जय”जगदंबा माता की जय, जय माता दि” असा जयघोष त्यांनी केला. ढोल ताशांच्या गजर फटाक्यांची आतषबाजी यामुळे गावातील वातावरण शिवमय बनले होते.

Tags:

chatrapati torch arrived at bijagarni village