Belagavi

सदाशिवनगरमध्ये नागरी समस्या आवासून !

Share

बेळगावच्या बहुतांश भागात एकामागून एक समस्या उदभवत आहेत. स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी होऊनही येथील समस्या अद्याप सुटलेल्या नसून त्या कधी सुटणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा पाहून येथे कोणी कूपनलिका काढली असेल असा जर तुमचा समज झाला तर तो चुकीचा आहे. बेळगाव येथील सदाशिव नगर 10 व्या चौकात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्याचे हे दृश्य आहे. सदाशिव नगर शेवटचा बस स्टॉप येथे गेल्या 10 वर्षापासून जलवाहिनी फुटल्याने कायम पाणी वाहून जाते. याबाबत तक्रारी करून, निवेदने देऊनही काहीच उपयोग होत नाही.

होय, सदाशिवनगर 10 व्या क्रॉसच्या रस्त्यावर एवढा भलामोठा खड्डा आहे. लहान मुले व वृद्धांचे जीव त्यामुळे धोक्यात आले आहेत. रस्त्यावर खड्डे पडलेले असतानाही संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तसेच सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथे नाल्याचा विकास झाला नाही, गटरची सीडी वर्क कोसळण्याच्या स्थितीत आहे. संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमदारांनी या भागाला भेट दिली होती पण नाला बांधकाम झाले नाही. गटारीवर नवीन सीडी बांधकाम केले पाहिजे. याबाबत संताप व्यक्त करत येथील रहिवासी प्रसाद चौगुले यांनी सांगितले की, रस्त्यावर उतार असल्याचे दिसले असून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनचीही गळती झाली आहे. ही खूप दिवसांपासूनची समस्या आहे. या खड्ड्यात लहान मुले पडल्याने अनर्थ होईल त्याला जबाबदार कोण..? या भागातच मनपा आयुक्त, तसेच खासदारांचे निवासस्थान आहे, सर्व रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत, एपीएमसी रोड सदाशिव नगर, नेहरू नगर, आझम नगर सर्कल, संगमेश्वर नगर संपूर्ण रस्ते खराब झाले.. रस्ता खराब असल्याने अपघात घडतात, विद्युत खांब बंद आहेत. याकडे आमदार व नगरसेवकांनी लक्ष देऊन समस्या तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी केली.

एकंदरीत, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी जागे होतील का आणि येथील समस्या सोडवतील का याची आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल.

Tags:

belgaum sadashiv nagar road problem