कागवाड तालुका महिला व बालविकास विभाग तसेच तालुका प्रशासन बालविकास विभाग यांच्या वतीने ४९९ लाभार्थ्यांना सुकन्या समृद्धी पासबुकचे वाटप आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

फरीदखानवाडी गावातील कटीगेरी सभागृहात शनिवारी सुकन्या समृद्धी पासबुक वाटप कार्यक्रम पार पडला. कागवाड तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व भाग्यलक्ष्मी लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सुकन्या योजनेच्या पासबुक वाटपानंतर आमदार श्रीमंत पाटील बोलताना म्हणाले, देशातील सर्व महिलांना योग्य सन्मान मिळावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकमेव स्वप्न होते . “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे त्यांचे एकमेव ध्येय होते. मात्र, समाजातील काही लोक स्त्री भ्रूणहत्येसारखे घृणास्पद कृत्य करत आहेत. गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास तिच्या कुटुंबावर भार पडण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकार भाग्यलक्ष्मी योजना राबविण्यात आली असून या योजनेत मुलीच्या २१ व्या वर्षापर्यंत १.२७ लाख रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे. आज तालुक्यातील ४९९ लाभार्थी मुलींना या योजनेचे पासबुक वितरित करण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले.

यावेळी भाजपचे तमन्ना पारशेट्टी, ऐनापूर नगरपंचायत सदस्य राजेंद्र पोतदार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार श्रीमंत पाटील यांनी कागवाड मतदार संघाच्या विकासाचा आराखडा तयार केला असून आज राज्य सरकारच्या सुकन्या योजनेअंतर्गत त्यांनी ४९९ कुटुंबातील मुलींना पासबुकचे वितरण करून उत्तम कार्य केल्याचे मत उभयतांनी व्यक्त केले. कागवाडचे सीडीपीओ संजीवकुमार सदलगे म्हणाले, पूर्वी भाग्यलक्ष्मी बाँड दिले जात होते. आता सरकार पोस्ट ऑफिसमध्ये मुलींच्या नावाने खाती उघडून पैसे जमा करत आहे. १.२७ लाख रुपये वयाच्या २१ व्या वर्षी या खात्यात जमा होतील. २०१६ पासून आतापर्यंत सर्व लाभार्थ्यांना सुकन्या योजनेचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कागवाड तालुका राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गौडप्पा सड्डी यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी कागवाडचे बीईओ एम.आर.मुंजे, उगार नगरपंचायत सदस्य प्रकाश थोरुशे, प्रताप जत्राटे, राजू पाटील, महादेव कटीगेरी, सुजय फराकट्टे, राकेश पाटील, सुभाष कुराडे आदींसह नागरिक उपस्थित होते.


Recent Comments