उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्यात यावा, या मागणीसाठी समीरवाडी येथील गोदावरी साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी घेराव घातला.

रायबाग तालुक्यातील हंदीगुंद हद्दीतील समिरवाडी साखर कारखान्यासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निदर्शने करून कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले. यावेळी शेतकरी गीत गाऊन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांची मते घेऊन निवडून आलेल्या आमदार, खासदारांनी विधानसौध येथे होणाऱ्या अधिवेशनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवावा. विधानसभेत आवाज न उठविल्यास येत्या काही दिवसांत पी.राजीव, सिद्धू सवदी, बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, साखर कारखाना आणि सरकार फसवणूक करत असून एफआरपी आणि वजनात फेरफार होत असल्याचा आरोप बागलकोट जिल्हा ऊस उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष बसवंत कांबळे यांनी केला.

याचप्रमाणे बागलकोट जिल्ह्यातील रयत संघाचे नेते सुभाष शिरगुर यांनीही उसाला हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली. उसाला हमीभाव जाहीर करण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी मल्लिकार्जुन खानगौडर, बसवराज हुगार, निपाणी तालुका शेतकरी नेते राजू पवार, गंगाधर मेट्टी, मल्लप्पा अंगडी, वकील केम्पन्न अंगडी, रमेश कल्लर, पराप्पा भंगी, इराप्पा भंगी, रामचंद्र सोनावणे आदींसह बेळगाव आणि बागलकोट येथील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments