खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय रयत संघ, कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ यांनी दिली.
खानापूरमध्ये यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शिवानंद मुगळीहाळ म्हणाले, खानापूर तालुका विकासापासून वंचित आहे. येथील कायदा- सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचा वीजपुरवठा, अपयशी व्यवस्थापन, सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे आणि प्राण्यांच्या उपद्रवामुळे अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील शेतकरी, शेतपिकांचे नुकसान होत आहे. शासनाकडून जी नुकसान भरपाई मिळायला हवी, ती येथील पीडित शेतकऱ्यांना मिळत नाही. येथील तरुण कामानिमित्त गोवा व महाराष्ट्रात स्थलांतरित होत आहेत. तालुका प्रशासन हि परिस्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयशी ठरले असून येथील यंत्रणा भ्रष्ट ठरली आहे. याविरोधात ३१ ऑक्टोबर रोजी जांबोटी क्रॉस येथून सकाळी ११ वाजता पायी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

याचप्रमाणे राज्य रयत संघाचे सरचिटणीस प्रकाश नाईक म्हणाले, खानापूर तालुका प्रशासन नागरी समस्या हाताळण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले असून येथील प्रशासन भ्रष्टाचाराने भरले आहे. शेतकरी आणि इतर लाभार्थ्यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत, नुकसान भरपाईची पूर्तता होत नाही, तालुका प्रशासनाच्या या भ्रष्ट आणि अपयशी कारभाराबद्दल ३१ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन छेडण्यात येणार असून या आंदोलनात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला शेतकरी नेते विजय कामत, अशोक छलवादी आदी उपस्थित होते.


Recent Comments