Belagavi

बेळगावात पुनीत राजकुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

Share

कन्नड चित्रपट अभिनेते, पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांचे निधन होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावमध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

२९ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या पुनीत राजकुमार यांच्या जाण्याने कन्नड चित्रपट सृष्टी आणि कर्नाटकातील जनतेवर शोककळा पसरली. गेल्या वर्षभरात पुनीत राजकुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक सामाजिक संघटना, चाहत्यांनी समाजाभिमुख उपक्रम राबवत पुनीत राजकुमार यांना आदरांजली वाहिली. पुनीत राजकुमार यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटक राज्य सरकारने कर्नाटक रत्न पुरस्काराची घोषणा केली आहे. आज त्यांची पहिली पुण्यतिथी असून बेळगावमधील पुनीत चाहत्यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

बेळगावमधील मठ गल्ली येथील चाणक्य युवक मंडळाच्यावतीने राणी चन्नम्मा चौकात पुनीत राजकुमार यांच्या छायाचित्राची सजविलेल्या वाहनावरून भव्य मिरवणूक काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. पुनीत राजकुमार यांच्या चित्रपटातील गाणी लावून कन्नड अभिमानी, शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिरवणुकीत सहभाग घेत पुनीत राजकुमार यांना आदरांजली वाहिली.

चन्नम्मा चौकात आमदार अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हा घटक अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनीही पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले, प्रसिद्ध सिनेअभिनेते, पॉवर स्टार पुनीत राजकुमार आज आपल्यातून निघून जाऊन एक वर्ष लोटले. त्यांनी केवळ अभिनय क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात देखील योगदान दिले. त्यांचे कार्य हे उल्लेखनीय असून त्यांचे समाजकार्य हे नेहमीच प्रत्येकासाठी आदर्शवत असेल, असे ते म्हणाले.

यानंतर आमदार अनिल बेनके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, डॉ. पुनीत राजकुमार हे कर्नाटकाची अभिमानास्पद आहेत. केवळ राज्य नाही तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श असे व्यक्तिमत्व असलेले डॉ पुनीत राजकुमार यांनी केलेले कार्य हे प्रत्येकाच्या सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार जाहीर केला असून बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांहून अधिक मोठं व्यक्तिमत्व पुनीत राजकुमार यांचे होते असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी अरुण बेल्लद, संतोष चौगुले, हिराचंद कलमणी, पदमराज वैजन्नवर, प्रकाश चौगुले, अभिषेक चौगुले आदी उपस्थित होते.

Tags:

belgaum-appu-punit-rajkumar-punyatithi/