बांधकाम व अन्य कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, संगणक, लॅपटॉपसाठी सरकारी अनुदान मिळत नसल्याच्या निषेधार्थ बांधकाम व अन्य कामगार आणि त्यांच्या मुलांनी बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
होय, राज्य सरकारने बांधकाम व अन्य कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करून कामगार आणि त्यांच्या मुलांना सुविधा, शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली खरी, मात्र त्या देताना अनियमितता आणि गोंधळ केला जात आहे. वेळेवर शिष्यवृत्ती आणि लॅपटॉपसाठी अनुदान दिले जात नाही. याबाबत यापूर्वीही सरकारला निवेदन देण्यात आले आहे. मात्र परिस्थितीत बदल झालेला नाही. याच्या निषेधार्थ बांधकाम व अन्य कामगार आणि त्यांच्या मुलांनी बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यासंदर्भात बोलताना बांधकाम व अन्य कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर यांनी प्रसारमाध्यमं सांगितले की, सरकारने बांधकाम व अन्य कामगारांसाठी राज्यस्तरीय कल्याण मंडळ स्थापन करून कामगारांना घर बांधण्यासाठी ५ लाख, मुलांचे विवाहासाठी २ लाख, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि लॅपटॉप खरेदीसाठी अनुदान देण्याची घोषणा केलीय. मात्र त्याचे वाटप सुरळीत होत नाही. या योजनेत राजकारण्यांचा वाढत हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे कामगार व त्यांच्या मुलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वीही आम्ही एकदा सरकारला निवेदन दिले आहे. मात्र परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन सुविधांचे सुरळीत वाटप न केल्यास भविष्यात उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अंजली जाधव या कामगाराच्या मुलीने सांगितले की, बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना लॅपटॉप अनुदान आणि शिष्यवृत्ती देण्यात गोंधळ केला जात आहे. अंतिम सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अद्याप लॅपटॉप देण्यात आलेले नाहीत. दरवर्षी असा गोंधळ घातला जात असल्याने आम्हाला हक्काच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे अशी तक्रार तिने केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, नारायण पवार, विष्णू टिम्बरे, सोमनाथ पाटील, प्रकाश धायगोंडे, सुनील गावडे, विठ्ठल देसाई, रुक्मान्ना कालकुंद्रीकर, केशव सांबरेकर, जोतिबा पाटील, भैरू धुडूम यांच्यासह बांधकाम व अन्य कामगार व त्यांची मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments