बेळगाव महानगरपालिकेसमोरील कन्नड ध्वज जीर्ण अवस्थेत असून या विरोधात कन्नड आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बेळगाव मनपासमोर असलेला कन्नड ध्वज ऊन – पाऊस आणि वाऱ्यामुळे जीर्ण झाला असून कन्नड राज्योत्सव तोंडावर येऊनही या ध्वजाकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार करत जिल्हा प्रशासनाविरोधात कन्नड आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. १ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाची तयारी जोरदार सुरु असून मनपासमोरील ध्वजाची हि अवस्था पाहून कन्नड आंदोलकांनी संताप व्यक्त केलाय.

यासंदर्भात बोलताना श्रीनिवास ताळूकर म्हणाले, मनपासमोर कन्नड ध्वज फडकविण्यासाठी बेळगावमध्ये कन्नड आंदोलकांनी संघर्ष केला. विमानतळाला राणी चन्नम्मा यांचे नाव देण्याची मागणी केली. बेळगावमधील सुवर्णसौध, प्रादेशिक आयुक्तांची कचेरी, मध्यवर्ती बस स्थानक आणि आता मनपा समोर कन्नड ध्वज फडकविण्यात आला. मागीलवेळी देखील ध्वज बदलण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र यावेळी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्योत्सवाला केवळ ४ दिवस बाकी असून सदर ध्वज तातडीने बदलण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
श्रीनिवास ताळूकर पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांवरील राजकारण्यांच्या दबावांमुळे किंवा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत याबद्दल आपल्याला अंदाज नाही मात्र आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याबद्दलचा आदर राखला जात नाही, अधिकारी राज्याच्या आदर्शांचे पालन न करता येथील प्रशासनाकडून पगार घेतात, अशी तक्रारही त्यांनी केली.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष पुरवून तातडीने सदर ध्वज बदलावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Recent Comments