लंपी रोगाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. प्रशासन व जनावरांचे सरकारी वैद्यकीय अधिकारी या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून जनावरांना लंपी रोगाची लागण होऊ नये, तसेच हा रोग पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या डास आणि माशांचा नाश करण्यासाठी केलेल्या आवाहनाला अनुसरून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, ग्रामीण मंडळाच्या वतीने कल्लेहोळ येथे औषध फवारणी करण्यात आली.

बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव आणि गावच्या पंचमंडळींच्या उपस्थितीत ट्रॅक्टर पूजन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. लंपी हा रोग त्वचेशी निगडित असून बाधित जनावरांवर बसलेल्या डास आणि माशांमुळे या रोगाचा संसर्ग अधिक वाढत आहे. याची खबरदारी घेऊन प्रशासनाने डास आणि माशांचा उपद्रव रोखण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार भाजप ग्रामीण मोर्चाच्या पुढाकाराने कल्लेहोळ गावात औषध फवारणी करण्यात आली.

या रोगावर अद्याप औषध उपलब्ध नसून रोगाचा प्रसार थांबविणे हा पर्याय सध्या अवलंबला जात आहे. हिरवा भाजीपाला, सफरचंद, तुळशीची पाने, हळद हे सर्व साहित्य तेलात गरम करून जखमांवर लावल्याने या रोगाचा प्रादुर्भाव रोखता येतो, अशी माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोठ्यांमध्ये स्वच्छता राखावी, डास आणि माशा नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांची फवारणी करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, त्वचारोगामुळे जनावरे त्रस्त होत आहेत. या रोगामुळे जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकारी प्रयत्नशील आहेत. बेळगाव ग्रामीण भागात सुमारे ४८ हजार जनावरे आहेत. यामध्ये ४२ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी गोठ्यात स्वच्छता राखावी आणि जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजप ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, हिंडलगा महाशक्ती केंद्राचे प्रमुख अनिल पाटील, यतिश हेब्बाळकर, रमेश कन्नूकर, सुरेश नागोजीचे, वसंत पाटील, मोनापा मरूचे, रुक्मांना मरूचे, भाऊ मरूचे, बाळू पाटील, अजित हलकर्णी, विलास तहसीलदार, मल्लप्पा कडेमनी, मोहन रागी पाटील, ओंकार पाटील, लक्ष्मण चोपडे आदी उपस्थित होते.


Recent Comments