Belagavi

ग्रहणामुळे बेळगावमधील रस्ते सामसूम!

Share

ग्रहणाविषयी आपल्याकडे बऱ्याच समजुती आहेत. काहीजण सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक असतात तर काहीजण या ग्रहणाविषयीची धार्मिकता पाळण्यात उत्सुक असतात! बेळगावमध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी पूजन पार पडले असून आज ग्रहण असल्याकारणाने बेळगावमधील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज कपिलेश्वर देवस्थानात विशेष पूजेचेही आयोजन करण्यात आले होते.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर देवस्थानात सकाळी ८ पासून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रहण संपल्यानंतर अनेक भाविकांनी देवदर्शन केले. अभिषेक, रुद्राभिषेक यासह विविध धार्मिक विधींचे सकाळी ८ पासूनच आयोजन करण्यात आले होते. दुपारी ग्रहणाचे वेध सुरु होण्यापूर्वी शिवलिंग बिल्वपत्रात मढवून पूर्वापारपासून ग्रहणकाळात सुरु असलेली हि प्रथा आजदेखील या मंदिरात पाळण्यात आली. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महामृत्युंजय जप, सायंकाळी ६.३० नंतर पूर्ण देवस्थानाची साफसफाई करून पुन्हा कपिलनाथाला रुद्राभिषेक करण्यात आला.

यावेळी पुजारी नागराज कट्टी यांनी आपली मराठीशी संवाद साधला. आजच्या सूर्यग्रहणाचा मोक्ष कालावधी हा अमावस्या संपल्यानंतर असून भाविकांनी कोणत्याही प्रकारची भीती मनात न बाळगता देवाचे नामस्मरण करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे खंडग्रास सूर्यग्रहण दुपारी २.१५ वाजता सुरु झाले. तर ६.३० मिनिटांनी संपले. ग्रहण संपल्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांनी कपिलेश्वर देवस्थानात दर्शनासाठी गर्दी केली. ग्रहण काळात भाविकांनी देव पाण्यात ठेवले होते. काल झालेल्या लक्ष्मीपूजनानंतर आज अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. आज बेळगावमधील रस्त्यांवर देखील तुरळक गर्दी पाहायला मिळाली.

Tags:

belgaum-kapileshwar-mandir-suryagruhan/