वीरराणी चन्नम्मा कित्तूर उत्सवाला आज भव्य मिरवणुकीने प्रारंभ करण्यात आला. वीरज्योतीचे स्वागत केल्यानंतर कित्तूर कलमठ येथील राजयोगींद्र स्वामीजी यांच्या उपस्थितीत राणी चन्नम्मा यांच्या प्रतिमेची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. अनेक मान्यवर आणि हजारो चाहते या अद्भुत क्षणाचे साक्षीदार झाले.


होय, बेंगळुरपासून सुरू होऊन संपूर्ण राज्याचा प्रवास करून बैलहोंगल येथील चन्नम्मा यांच्या समाधीला भेट देऊन आलेल्या वीरज्योतीचे आज, सोमवारी सकाळी १० वाजता कित्तूर शहरातील चन्नम्मा चौकात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार महांतेश दोड्डगौडर, महांतेश कौजलगी, काडा अध्यक्ष डॉ. विश्वनाथ पाटील, जिल्हाधिकारी नितीश पाटील, जि. पं. सीईओ दर्शन, एसपी डॉ. संजीव पाटील, राज्य हस्तकला विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुती अष्टगी व इतर मान्यवर उपस्थित होते. चन्नम्मा पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उत्सव ध्वज व मशालीचे स्वागत करण्यात आले. ज्योतीच्या स्वागतानंतर राजगुरू संस्थान मठ, कित्तूरचे मडीवाळ राजयोगिंद्र स्वामीजी यांनी लोककला वाहिनीला चालना दिली. मयूर नृत्य, केरळच्या थीमवर नृत्य, पूजा नृत्य, नंदीध्वज, पथ नृत्य, बाहूली नृत्य, झांज पथक यासह विविध कला मंडळातील शेकडो कलावंतांनी कला प्रदर्शन केले.

विविध लोकगीते गात, लोक कलाकारांनी चन्नम्मा यांच्या शौर्याचे आणि साहसाचे गुणगान गाऊन कित्तूरचे गतवैभव पुन्हा जिवंत केले. हत्तीवरून निघालेली चन्नम्माजींची भव्य मिरवणूक कित्तूर शहरातील मुख्य रस्त्यांवरून जाण्याची ही पहिलीच वेळ होती. यासोबतच विविध सरकारी खात्यांची कामे आणि प्रकल्पांबाबत जनजागृती करणारे स्थिर चित्ररथही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पूर्ण कुंभ घेतलेल्या शेकडो महिलांनी कलावाहिनीच्या दीपोत्सवात भर घातली. विविध कलासमूहांचे प्रदर्शन पाहण्यासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा जमले होते. याच प्रसंगी मान्यवरांनी कित्तूर महाद्वाराजवळील शूर संगोळ्ळी रायण्णा आणि आमटूर बाळाप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उत्सवाचा एक भाग म्हणून कित्तूर येथील गडडामराडी येथे जिल्हाधिकारी नितीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार महांतेश दोड्डगौडर म्हणाले, आनंद मामनी यांचे काल दुःखद निधन झाले, आज कित्तूर उत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे आदरपूर्वक स्वागत करू. दोन दिवस होणारे विविध कार्यक्रम यशस्वी करूया. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उद्या संध्याकाळी ७ वाजता येत आहेत. याशिवाय अनेक मंत्री, आमदार सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी, यावर्षीपासून कित्तूर उत्सव हा राज्यस्तरीय महोत्सव झाल्याचे सांगितले. हा राष्ट्रीय सण व्हावा यासाठी नजीकच्या काळात केंद्र सरकारशी चर्चा करण्याची गरज आहे. आपल्या दुर्दैवाने आनंद मामनी यांच्या मृत्यूची गडद छाया आपल्या सर्वांवर आहे. मात्र, दोन दिवस चालणारा हा महोत्सव मोठ्या थाटात पार पडणार आहे. राणी चन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे. कर्नाटकचा इतिहास जगाला दाखवण्यासाठी लष्करातील एका बटालियनला कर्नाटक नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
राजयोगिंद्र स्वामीजी म्हणाले, राज्य सरकारने जिल्हास्तरीय महोत्सवाचे राज्यस्तरीय महोत्सवात रूपांतर केले आहे. येत्या काळात तो राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव बनेल यात शंका नाही. राणी चन्नम्माजींची कीर्ती संपूर्ण देशात खूप गाजणार आहे. आज संध्याकाळी येणार्या मुख्यमंत्र्यांना याबाबत आम्ही प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीतच राज्यस्तरीय कित्तूर महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. मात्र भव्य मिरवणुकीच्या उद्घाटनात जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ हे अनुपस्थित होते. त्यांची उपस्थिती सर्वांचाच खटकली. नावाप्रमाणेच हा राज्यस्तरीय उत्सव नसून जिल्हास्तरीय नेते व अधिकाऱ्यांनी या मिरवणुकीला चालना दिली. त्यामुळेच या भागातील जनतेत रोष निर्माण झाला होता.


Recent Comments