Belagavi

बेळगाव बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी खरेदीची झुंबड

Share

कुंदानगरी बेळगावात प्रकाशदिव्यांचा सण दिवाळी जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये आज एकच झुंबड उडाली.

 

होय, दिव्यांच्या सणाची चमक वाढवण्यासाठी लोकांनी फुलं, फळं, भाजीपाला आणि सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी विविध बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. गेल्या तीन वर्षांपासून कोविडमुळे सर्वांनी सध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.

 

यावर्षी, कोविडची तीव्रता कमी झाल्यामुळे सगळेच सण-उत्सव जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत. सणासुदीचे माहेर असलेले बेळगाव तरी मग त्यामध्ये मागे कसे राहील? शहराची ही उत्सवप्रियतेची परंपरा आज पुन्हा दिसून आली. लक्ष्मी-कुबेर पूजनानिमित्त बेळगावातील रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, शनिवार खूट, समादेवी गल्लीसह  होलसेल फुल मार्केट आदींसह उपनगरीय बाजारपेठांत फळे, फुले व सजावटीच्या वस्तूंची जोरदार खरेदी-विक्री झाली. रविवारपासून पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजनाची पार्श्वभूमी असल्याने पूजा साहित्य खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती. ऊस, झेंडूची  फुले, शेवंतीची फुले, फळे, आकाशकंदील, तोरण, सुगंधी तेल, साबण, उटणे, मातीची भांडी आदी वस्तूंची जोरात खरेदी-विक्री झाली. सर्वच बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या. त्यामुळे व्यावसायिकही खुश दिसत होते.

Tags:

diwali diwalishopping happydiwali