Kagawad

उगार शुगर्सच्या कामगारांना 6.37 कोटी रु. बोनस : एम. डी. चंदन शिरगावकर

Share

कागवाड तालुक्यातील उगार साखर कारखान्याच्या कामगारांना दिवाळी सणानिमित्त 6.37 कोटी रुपये बोनस देण्याची घोषणा कारखान्याचे एम. डी. चंदन शिरगावकर यांनी केली.

उगार येथील विहार सभा भवनात आज, रविवारी साखर कारखाना जिमखाना सभासदांना दिवाळी सणानिमित्त मिठाई व भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम पार पडला. जिमखान्याने यावर्षी 80 वा वर्धापन दिन साजरा केला असून, सर्व सदस्यांना मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलतांना साखर कारखान्याचे एमडी चंदन शिरगावकर म्हणाले की, उगार साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, गेल्या वर्षी उसाला 2700/- रुपये प्रतिटन भाव आम्ही दिला. त्याच हंगामासाठी 50/- प्रति टन. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. चालू हंगामातील उसासाठी आम्ही 2800/- प्रति टन भाव जाहीर केला आहे. तसेच कारखान्यातील कामगारांना त्यांच्या वेतनाच्या 20 टक्के म्हणजे 6.37 कोटी रुपये बोनस आम्ही देत आहेत. जिमखाना सभासदांना मिठाई व भेटवस्तू देऊन त्यांनी सर्व शेतकरी व मजुरांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या व अधिकाधिक ऊस पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

साखर कारखान्याचे जिमखाना सचिव भुजबली अकिवाटे म्हणाले की, साखर कारखान्याची सूत्रे एम. डी. चंदन शिरगावकर यांनी हाती घेतल्यानंतर त्यांनी साखर कारखान्याच्या विकासावर अधिक भर देत ऊस गाळप क्षमता दररोज 20,000 टन पर्यंत वाढवली आहे. को-जनरेशन युनिट दररोज 75 मेगावॅट वीज निर्मिती करत आहे. आशिया खंडात उच्च क्षमतेचा इथेनॉल प्लांट सुरू केला आहे. उगारचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी मंदिरात 25 किलो चांदीचे प्रवेशद्वार बांधून 20 हजार लाडू मिठाईचे वाटप करण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण नगर 11 दिवस रोषणाईने सजले होते. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त श्रीहरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी विद्या गुडोदगी हिला विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल 1 लाख रुपये आणि इयत्ता 10वीतील स्वाती सूर्यवंशी हिला राज्यात चौथ्या क्रमांकावर आल्याबद्दल 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. चंदन शिरगावकर यांच्या या उपक्रमाचे शेतकरी व जनतेतून कौतुक होत असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी चंदन शिरगावकर यांच्या धर्मपत्नी गीतांजली शिरगावकर, कन्या स्वरा शिरगावकर, वरिष्ठ अधिकारी आर. एन. सिद्धांती, सचिन शिंदे, सी. के. पिंपळकर, डी. के. पेंडसे, एम. बी.जोशी, अतुल नाईक, नितीन पत्की, संतोष तळंदगे आदी उपस्थित होते.

Tags:

ugar-sugar-factory-labour-bonus/