Belagavi

राज्यस्तरीय कित्तूर उत्सवाची जय्यत तयारी : आम. महांतेश दोड्डगौडर

Share

कित्तूर महोत्सवाला मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय उत्सव म्हणून घोषित केले असून यंदाचा कित्तूर उत्सव २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कित्तूर मतदार संघातील आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी या उत्सवासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांनी १९२४ साली ब्रिटिशांवर मिळविलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी कित्तूर येथे भव्य उत्सव साजरा केला जातो. यंदाचा उत्सव राज्यस्तरीय पातळीवर साजरा करण्यात येणार असून या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

कित्तूर उत्सवाच्या निमित्त २ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते विरज्योतीला चालना देण्यात आली होती. आज या ज्योतीचा २१ वा दिवस असून बैलहोंगल येथील राणी चन्नम्मा समाधीजवळ विरज्योतीचे आगमन झाले. रविवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा येथे विरज्योतीचे आगमन होईल. यावेळी हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार असून विरज्योतीच्या स्वागतासाठी विविध विभागाचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा अधिकारी, विविध लोकप्रतिनिधी तसेच कित्तूर येथील जनता सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर दुपारी ३ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तीन व्यासपीठांवरून विविध कार्यक्रम साजरे केले जातील. कित्तूर किल्ल्याच्या आवारातील राणी चन्नम्मा व्यासपीठ, गुरुसिद्वेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर मल्लसर्जा देसाई व्यासपीठ, कलमठ समोरील चन्नम्मा सैनिक शाळेच्या मैदानात संगोळी रायण्णा व्यासपीठ अशा तीन ठिकाणी व्यासपीठाची उभारणी करण्यात आली असून या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे दोड्डगौडर यांनी सांगितले.

२४ ऑक्टोबर हा संपूर्ण दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असून यादिवशी काव्य मैफल, कित्तूर चन्नम्मा यांचा इतिहासावर आधारित कार्यक्रम तसेच विविध लढवय्यांचा इतिहास, साहित्यिक मैफल, रसिक साहित्यिक मैफल व इतर साहित्यिक उपक्रम आयोजिण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे उदघाटन होणार असून इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती, जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, शशिकला जोल्ले, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर, अक्कमहादेवी विद्यापीठाच्या कुलपती आदी मान्यवर सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags:

belagavi-kittur-utsav-pre-meeting/