Belagavi

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बेळगाव बाजारपेठेत खरेदीला उधाण

Share

“दिवाळी सण मोठा.. नाही आनंदाला तोटा…”! या उक्तीप्रमाणे बेळगावकर दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बेळगावच्या बाजारपेठेत गल्लोगल्ली तुडुंब गर्दीने रस्ते फुलले असून खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

झगमगते आकाश कंदील, आकर्षक इलेक्ट्रॉनिक लायटिंगच्या माळा, रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू आणि चैतन्याने भारलेले वातावरण सध्या बेळगाव शहर परिसरात दिसून येत आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तसेच शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टीचे असल्याने बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

दिवाळी सणाचे प्रमुख आकर्षण असणारे आकाशकंदील ठिकठिकाणी स्टॉलसवर विक्री करण्यात येत आहेत. अलीकडे नानाविध प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. बांबूच्या वेतापासून बनविण्यात येणाऱ्या आकाशकंदिलांच्या मागणीसह नवनव्या आकाशकंदिलानाही मागणी वाढली आहे. १०० ते १००० रुपयापर्यंतच्या किमतीचे आकाशकंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत.

मागील २ – ३ वर्षात कोविडमुळे सण उत्सवावर विरझन आले. यंदा मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्याची इच्छा ठेवलेल्या नागरिकांना पावसाने हात दिला असून गेल्या आठवड्याभरात पावसाचा जोर देखील वाढल्याने नागरिकांच्या उत्साहावर काहीसे विरझन पडले आहे. दिवाळीसाठी बाजारपेठेत आकर्षक तोरण दाखल झाले असून ४० ते १०० रुपये किमतीची आकर्षक अशी तोरण सामुग्रीही उपलब्ध झाली आहे.

दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाला अधिक महत्व असते. घरोघरी तसेच आस्थापनांमध्ये मोठया जल्लोषात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीही आजपासूनच नागरिकांनी सुरु केली असून यंदा बाजारपेठेत पारंपरिक मातीच्या पणत्यांप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक आणि पाण्यावर जळणाऱ्या दिव्यांची चलती आहे. खर्चात कपात आणि इकोफ्रेंडली असे असणाऱ्या या दिव्यांनाही ग्राहकांची चांगलीच पसंती आहे. याशिवाय रंगीबेरंगी रांगोळ्या, किल्ला बनविण्याचे साहित्य, आणि कापड दुकानात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

कोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात दिवाळी सणासाठी नागरिकांनी तयारी सुरु केली असून यंदा बाजारपेठेत उपलब्ध झालेल्या निरनिराळ्या आणि आकर्षक वस्तूंमुळे बाजारपेठ फुलली आहे. गेल्या २ – ३ वर्षात कमी पडलेली कसर यंदाच्या दिवाळीत भरून काढण्यासाठी नागरिकांनी कम्बर कसली आहे.

बेळगावमधील मारुती गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली आणि खडेबाजार परिसरात आज नागरिकांनी दिवाळी खरेदीसाठी तुफान गर्दी केली आहे.

Tags:

belagavi-diwali-festival-market-full-rush/