बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील बांधकाम कामगारांनी बेळगाव मधील कामगार विभागाच्या कार्यालयाला घेराव घालून शुक्रवारी आंदोलन केले. कामगारांच्या कार्डसाठी अर्ज करूनही त्यांना लवकर कार्ड मिळत नाही. ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्यांना सरकारी सुविधा नीट मिळत नाहीत. शिक्षण सुविधा, लग्नाचे अनुदान, बस पास, किट यासह कोणतेही अनुदान मिळत नसल्याची तक्रार करत कामगारांनी संताप व्यक्त केला.

यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन आर लातूर म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात २ लाखाहून अधिक बांधकाम कामगारांनी नाव नोंदणी करून कार्ड मिळवले आहे. गेल्या महिन्यात कामगार विभागाने कामगारांना बस पास देण्याचा आदेश काढला होता. मात्र आता ती वेबसाईट बंद करण्यात आली आहे. बस पासचे वितरण तातडीने सुरू करावे. जिल्ह्यातील सर्व कामगारांना बसपास वाटप करण्यात यावे.
गेल्या वर्षी यशस्विनी पोर्टलवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ७० टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली होती. विद्यार्थ्याचे स्टायपेंड देखील सर्वांना वितरित केले जावे. तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना लॅपटॉपचे वाटप करण्यात यावे. याशिवाय विवाह भत्ताही दिला जात नाही. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या आंदोलनात सोमनाथ पाटील, गोरक डौरी, हिरामणी होनगेकर, इराप्पा पाटील, कल्लाप्पा पाटील आदी सहभागी झाले होते.


Recent Comments