Vijayapura

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन

Share

देशाच्या सुरक्षेसाठी आणि समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या अनेक पोलिसांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. अशा शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्याचा दिवस म्हणजेच २१ ऑक्टोबर. देशभरात पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात येते. यानिमित्ताने आज विजापूरमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विजापुरातील पोलीस मैदानात पोलीस हुतात्मा दिनानिमित्त जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्तव्य बजाविताना हौतात्म्य पत्करलेल्या शहीद पोलिसांना यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या बलिदान व सेवाभावाचे स्मरण केले. हवेत तीन गोळ्यांच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विजयमहांतेश दानम्मानवर, विशेष निमंत्रित अतिथी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक एच. डी. आनंदकुमार, वरिष्ठ अधीक्षक डॉ. राम अरसिद्दी, वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी यासह इतर मान्यवर आणि पोलिसांच्या कुटुंबीयांनीही सहभाग घेतला.

Tags: