Banglore

केम्पेगौडा यांच्या १०८ फुटी पुतळ्याचे लवकरच अनावरण

Share

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विजयनगर साम्राज्यात बुद्धिमान आणि कलाप्रेमी राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून हा पुतळा कर्नाटकातील जनतेच्या स्वाभिमानाचे प्रतीक असेल, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.

राजा केम्पेगौडा यांच्या १०८ फुटी कांस्य पुतळ्याचे अनावरण ११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मातीचे संकलन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, देशाने आजवर अनेक राजा आणि त्यांची साम्राज्ये पहिली आहेत. बहुतेक राजांनी त्यांचा काळ युद्धात आणि साम्राज्याच्या विस्तारात घालवला. पण कर्नाटकचा इतिहास वेगळा आहे.

आपल्या पूर्वजांनी देश घडवण्याचे काम केले. केम्पेगौडा यांनी चांगले शहर वसवले. होयसळ आणि कदंबांनी देशाची संरचनात्मक बांधणी केली. त्यांनी पुरोगामी विचारसरणीसह आधुनिकतेची प्रशंसा केली आहे. अशा लोकांमध्ये केम्पेगौडा हे आघाडीवर आहेत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केम्पेगौडांनी व्यावसायिक कामांसाठी बाजारपेठ तयार केली. व्यवसाय आणि समाजाच्या जोरावर त्यांनी शहर वसवले. सामाजिक न्याय दिला. नवीन तंत्रज्ञान दिले. केम्पेगौडा हे एक मुत्सद्दी राजा होते, असे सांगत केम्पेगौडा यांच्यासंदर्भात इतर माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

लोककल्याणाच्या माध्यमातून इतिहास घडवणाऱ्या केम्पेगौडा यांचा पुतळा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात येत असून या पुतळा उभारणीसाठी अश्वथ नारायण, आर अशोक, डॉ. सुधाकर आणि अनेक नेत्यांनी कठोर परिश्रम घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

ज्यापद्धतीने गुजराथ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव दिले आहे त्याप्रमाणे केम्पेगौडा यांच्या भव्य पुतळ्याला प्रगतीचे प्रतीक मानून नाव देण्यात आले असून ‘स्टॅच्यू ऑफ प्रोस्पेरिटी’ असे नाव देण्यात आले असून हा पुतळा कर्नाटकातील जनतेसाठी स्वाभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी आदी चुंचनगिरी मठाचे निर्मलानंदनाथ स्वामीजी, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, डी व्ही सदानंदगौड, गृहमंत्री आरोग्य ज्ञानेंद्र, मंत्री डॉ. अश्वथ नारायण, डॉ. के सुधाकर, गोपालय्या, भैरती बसवराज, मुनिरत्न, नारायण गौड, सुनील कुमार, खासदार पी सी मोहन, तेजस्वी सूर्य, एस मुनीस्वामी, लहर सिंग आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags:

kempegoud-108-feet-statue-inaugurated-by-cm-bommai/