Belagavi

बातमीचा परिणाम! कडोलीतील ग्रामपंचायतीचे डोळे उघडले!

Share

कडोली येथील प्रमुख गल्ल्यांपैकी एक असलेल्या वैजनाथ गल्लीतील उद्भवलेल्या असुविधांबाबत नुकतेच इन न्यूजच्या आपली मराठी वाहिनीवरून वृत्त प्रसारित करत येथे उद्भवलेल्या समस्यांचा विस्तृत तपशील दाखविण्यात आला होता. हे वृत्त प्रसारित होताच या गल्लीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने पाऊल उचलले असून येथील समस्या लवकरच सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

इन न्यूजच्या आपली मराठी वाहिनीवरून कडोली येथील वैजनाथ गल्लीच्या दुरवस्थेबाबत एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या गल्लीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, गटारी, तुंबलेले पाणी आणि यामुळे नागरिकांचे होत असलेले हाल यासंदर्भात विस्तृत वृत्तांकन प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत आमदार सतीश जारकीहोळी यांनी त्यांचे निकटवर्तीय, केपीसीसी सदस्य मालगौडा पाटील यांना वैजनाथ गल्लीत पाठवून तेथील समस्यांचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. यानुसार ग्रामपंचायत सदस्यांनी, मलगौडा पाटील आणि इतर अधिकाऱ्यांसह वैजनाथ गल्लीला भेट देऊन येथील रहिवाशांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

वैजनाथ गल्लीची पाहणी करून येथील समस्यांचा आढावा घेतल्यानंतर या गल्लीचे सर्व प्रश्न त्वरित सोडविण्यात येतील, यासाठी ग्रा.पं. अधिकारी, जेजेएम योजना, हेस्कॉम अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे आश्वासन मलगौडा पाटील यांनी दिले. सध्या भरपूर पाऊस पडत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रस्त्यावरील खड्ड्यांवर खडी टाकून रस्ता दुरुस्त करण्यात येणार असून पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर दोन्ही बाजूंने दर्जेदार सीसी रस्ता व गटार बांधण्यात येईल, असे आश्वासन मलगौडा पाटील यांनी रहिवाशांना दिले.

यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांम्बळे, ग्रा पं अध्यक्षा रेखा सुतार, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष राजू मायाण्णा, दत्त सुतार, माजी ग्राम पंचायत सदस्य गजानन कागणीकर, राजू सुतार, गंगाराम लाड, यल्लाप्पा पावले, शंकर लोहार, नागाप्पा कटबुगोळ आदींसह गल्लीतील रहिवासी उपस्थित होते. यानंतर भाजप प्रणित ग्राम पंचायत सदस्या वैशाली बिजगत्तीचे आणि सुरेखा पवार यांनीही या भागात भेट देऊन पाहणी केली.

Tags:

innews impact