Hukkeri

पंचमसाली नेत्यांविरोधात षडयंत्र रचले तर खबरदार!

Share

पंचमसाली नेत्यांविरोधात षडयंत्र रचले तर पंचमसाली समाजातील लोकांचा नक्कीच उद्रेक होईल, आरक्षणप्रश्नी सरकारला दिलेली मुदत संपली असून १२ डिसेंबर रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी २५ लाख पंचमसाली एकत्र येतील आणि विधानसौधवर मोर्चा नेतील, असा इशारा बसवजयमृत्युंजय स्वामीजींनी दिला.

पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत आरक्षण देण्याबाबत बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हुक्केरी येथे भव्य परिषद झाली. यावेळी सुरुवातीला शेतकरी गीत वाजविण्यात आले. जयमृत्युंजय स्वामीजींनी हिरवी शाल पांघरून उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले.

यावेळी अरुण सिंह आणि इतर राजकीय पक्षांना बसवजयमृत्युन्जय स्वामींनी कडाडून इशारा दिला आपल्या समाजाविरोधात आणि समाजातील नेत्यांविरोधात कोणीही षडयंत्र रचत असले तर पंचमसाली समाजाचा उद्रेक होईल. हि बाब केवळ बसनगौडा पाटील यत्नाळ आणि अरविंद बेल्लद यांच्यापुरती मर्यादित नाही. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली तर खबरदार असा इशारा स्वामीजींनी दिला. या नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण समाज खंबीरपणे उभा असून जर या नेत्यांविरोधात दडपशाही करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर समाजाचा शाप भोवेल, सरकारने आरक्षणप्रश्नी दिलेली मुदत संपली असून आता पुढील गोष्टींसाठी सरकारने तयारी ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला.

बसवजयमृत्युन्जय स्वामी पुढे म्हणाले, सर्व समाजातील स्वामी परवानगी घेण्यासाठी जातात. मात्र आपण आंदोलन पुकारले. सरकारने आरक्षणप्रश्नी दिलेले शब्द पाळले नाहीत. मात्र आता १२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लाखो पंचमसाली नागरिकांच्या भव्य मोर्चाला झेलण्याची तयारी सरकारने ठेवावी असा इशाराही स्वामीजींनी दिला.

यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, जिथे सूर्य मावळात नाही अशा समाजाचे आपण वंशज आहोत. माझ्या मतदारसंघात ५ ते ६ हजार पंचमसाली नागरिक आहेत. पंचमसाली स्वामींनी समाजासोबत चालण्याचा आशीर्वाद आपल्याला दिला असून आरक्षण जाहीर करून सरकारने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी मंत्री विनय कुलकर्णी बोलताना म्हणाले, राजकारणात कोणीही आम्हाला सोडणार नाही आणि स्वामीजींनाही नाही. प्रत्येकाच्या विरोधात कटकारस्थाने सुरू आहेत. आपल्या समाजाविरोधात पद्धतशीरपणे कारस्थान करणाऱ्यांविरोधात आता उभे राहण्याची गरज असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध आपला संघर्ष उफाळून येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. शिवाय आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, असा इशाराहि त्यांनी दिला.

यावेळी बसवजयमृत्युंजय स्वामीजी, आमदार बसनगौडा यत्नाळ, अरविंदा बेल्लद, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विजयानंद काशप्पनवर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, माजी मंत्री विनय कुलकर्णी, माजी आमदार विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Tags:

hukkeri-panchamasali-samavesh-for-2-a-reservation/