बेळगावमधील सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेना यांच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनात शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ताकद आणि हिंमत असेल तर कित्तूर उत्सवापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उसाला ५५०० रुपये दर जाहीर करावा अशी आव्हानात्मक मागणी केली आहे.
ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, उसाला हमीभाव देण्यासाठी आंदोलने सुरु आहेत. गेल्या १५ दिवसांपासून उसाला ५५०० रुपये प्रतिटन प्रमाणे दर देण्याची मागणी करत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून, आज बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखून ताब्यात घेतले आहे. हत्तरगी येथील हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्यात आल्याने पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी म्हणाले, दिवाळीच्या दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गोड बातमी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी बैठक बोलाविली. मात्र सदर बैठक अयशस्वी ठरली. सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने आपण आंदोलन छेडले असून कित्तूर उत्सवापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर जाहीर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
कित्तूर उत्सवापूर्वी ऊसदर जाहीर न झाल्यास या उत्सवात कोणत्याही लोकप्रतिनिधीला सहभागी होता येणार नाही , या उत्सवात तहसीलदारांचा सहभाग असावा मात्र, कोणत्याही लोकप्रतिनिधीला ऊसदर जाहीर होईपर्यंत सहभागी होता येणार नसल्याचे ते म्हणाले. कित्तूर राणी चन्नम्मा यांच्याबद्दल आपल्यालाही आदर आहे. मात्र शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सातत्याने खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करत असल्याबाबत, याचा जाब त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून बेळगावमध्ये आंदोलनासाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या पंधरवड्यात उसाला हमीभाव देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शेतकऱ्यांनी अहोरात्र धरणे आंदोलन छेडले.
दरम्यान, साखर मंत्री शंकर पाटील मुनेन्कोप्प यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली. मात्र सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने तसेच शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत शेतकऱ्यांना अटक करून कोणतेही प्रश्न सुटणार नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला.


Recent Comments