आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आज बेळगावमधील पोलीस विभागातर्फे आदरांजली वाहण्यात आली. पोलीस परेड मैदानावर विविध अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्ताने आज बेळगाव जिल्हा पोलीस मैदानावर पोलीस हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन सय्यद अजीज, आयजीपी सतीश कुमार, शहर पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या, एसपी डॉ संजीव पाटील, निवृत्त डीजीपी भास्कर राव यांच्यासह डीसीपी, एसीपी, पीएसआय आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी हवेत तीन फैरी झाडून शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन सय्यद अजीज बोलताना म्हणाले, देशात दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस शहीद दिन साजरा केला जातो. पोलिस सर्वस्वाचा त्याग करून समाजातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळतात असे आपल्याला वाटते पण पोलीस केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचीच जबाबदारी पार पाडत नाहीत तर देशातील सर्व स्तरावर सुरक्षेची जबाबदारीही ते पार पाडतात. पोलिसांनी देशाच्या सुरक्षेसाठी केलेला त्याग आणि त्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही, असे मुस्तफा हुसेन सय्यद अजीज यांनी सांगितले.
यावेळी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन.सतीश कुमार, बेळगाव शहर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, डीसीपी डॉ. रवींद्र गडादि, महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


Recent Comments