चिकोडी तालुक्यातील करोशी या गावातील शेतवाडीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे चक्क ३० घरांचा संपर्क तुटला आहे.


चिकोडी तालुक्यातील करोशी या गावातील शिंदे शेतवाडीतील जनता खड्डेमय रस्त्यामुळे मेटाकुटीला आली आहे. पावसाला सुरुवात झाली कि या भागातील रस्ते मृत्यूला आमंत्रण देणारे ठरत असून थोड्याशा पावसामुळेही रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत आहे. या रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच रस्त्यावरून दररोज शाळकरी मुलेही कसरत करून ये जा करत असून वयोवृद्ध नागरिक आणि महिलांनाही या रस्त्यावरून मार्गस्थ होताना जीव मुठीत धरून जाण्याची वेळ आली आहे.

या खराब झालेल्या रस्त्यामुळे इतर शहरातून शिंदे शेतवाडीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरी येणारे नातेवाईक व पाहुणे या रस्त्यावरील खड्डे पाहून परत जात असल्याची तक्रार शिंदे शेतवाडीतील नागरिक करत आहेत. दोन फूट खड्ड्यातून मार्गस्थ होण्यापेक्षा माघारी परतलेले बरे! या भावनेतून अनेक नातेवाईकांनी आपल्या घराकडे पाठ फिरवल्याचे येथील नागरिक सांगतात
या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, आणि येथील नागरिकांची रस्त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्येपासून सुटका करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.


Recent Comments