राज्यातील बहुतांशी समाजाच्यावतीने आरक्षणासाठी संघर्ष सुरु असून आता उप्पार समाजानेही आपला समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट करावा अशी मागणी उचलून धरली आहे.
कर्नाटक राज्य उप्पार महासभा आणि राज्य उप्पार अनुसूचित जमाती आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी बेळगावमध्ये आंदोलन छेडण्यात आले होते. उप्पार समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा सर्कल ते डीसी कार्यालयापर्यंत रॅली काढून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या.

यावेळी राज्य उप्पार एसटी आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बगली रेवण्णा म्हणाले, राज्यातील ५० लाख लोकसंख्या असलेल्या उप्पार समाजाकडे सर्व सत्ताधारी, राजकीय पक्ष दुर्लक्ष करत आहेत. आपल्या समाजाची अशीच अवहेलना होत राहिली तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, उप्पार समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी सर्व आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात येऊनही आपल्या समाजाला न्याय मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
उप्पार समाजातील लोक आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या मागासलेले आहेत. केवळ मतांसाठी उप्पार समाजातील लोकांचा वापर करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशाराहि रेवण्णा यांनी दिला.
यावेळी उप्पार समाजाच्यावतीने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारदरबारी निवेदन सादर केले. या आंदोलनात उप्पार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments