Belagavi

बेळगाव जिल्ह्यात दलितांवर अन्याय होऊ देणार नाही : एसपी डॉ. संजीव पाटील यांची ग्वाही

Share

बेळगाव जिल्ह्यात कोणत्याही कारणास्तव दलितांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. मी सुद्धा दलित वस्त्यांत येऊन तुमच्या समस्या ऐकून घेईन असे आश्वासन एसपी डॉ. संजीव पाटील यांनी दिले.

एसपी डॉ. संजीव पाटील यांनी आज, बुधवारी बेळगाव येथील एसपी कार्यालयात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील दलित नेत्यांची बैठक घेतली. यावेळी दलित नेत्यांनी आपल्या विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी बोलताना दलित नेत्यांनी सांगितले की, चिक्कोडी तालुक्यातील मुगळी ग्रामपंचायतीमध्ये दोन गावांमध्ये कालवा आहे. अजून रस्ता नाही. 40 दलित कुटुंबे असून 25 दलित विद्यार्थ्यांना शेजारील असोटी गावात शाळेत जावे लागते. पाऊस पडला की नाले तुडुंब भरून जातात. त्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नसून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. तसेच आणखी एका दलित नेत्याने सांगितले की, आम्हाला, ‘जिल्हाधिकार्‍यांचे पाऊल गावाकडे’ ही मोहीम नको आहे, पोलिसांचे पाऊल दलितांच्या वस्तीकडे , असा कार्यक्रम सुरू केला पाहिजे. पोलिसांनी आमच्या भागात येऊन आमच्या समस्या ऐकून घ्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली.

दलित नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एसपी डॉ. संजीव पाटील यांनी घरांचे वाटप करण्याबाबत मी जिल्हा पंचायत मुख्याधिकाऱ्यांशी बोलणार आहे. जेव्हा पोलीस ठाणे स्तरावर दलितांच्या बैठका घेतल्या जातात तेव्हा तुम्हाला व्यवस्थित बोलावले पाहिजे. पुढील बैठकीपर्यंत आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडविण्याचे काम करू. मी स्वतः दलित वस्तीला भेट देतो. मी यापूर्वीही एका ठिकाणी गेलो आहे. बीट लेव्हलपासून ते एसपी ऑफिसपर्यंत आम्ही चांगला प्रतिसाद देतो. यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी, समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक उमा सालीगौडर आणि इतर अधिकारी आणि दलित नेते उपस्थित होते.

Tags:

belgaum-sp-sanjivkumar-patil-meeting-with-dalit/