बेजबाबदार आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत निपाणी शहरात जय कर्नाटक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाला घेराव घातला.

निपाणी तहसीलदार कार्यालय भ्रष्टाचाराने बोकाळला असून अन्नधान्य आणि भूविभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप जय कर्नाटक संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष मलिकजान तळवार यांच्या नेतृत्वाखाली आज निपाणी येथे आंदोलन छेडण्यात आले.अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत देण्यात आलेल्या शिधापत्रिकांसंदर्भात येथील अधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता उलट सुलट उत्तरे मिळत असून उद्धटपणाचे वर्तन येथील अधिकारी करत आहेत.

एका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने अधिकारी वागत असतील तर सर्वसामान्य जनतेला कशी वागणूक दिली जात असेल असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. अशा उद्धट अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष पुरवून कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी करत जय कर्नाटक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांनी निवेदन स्वीकारले. ()
यावेळी निपाणी तालुका अध्यक्ष विठ्ठल ढवळे, गोकाक तालुका अध्यक्ष अजित मोकाशी, चिकोडी तालुकाध्यक्ष सुनील माळी, युनूस बिसली, राजू पाटील, जरीना शेख, रुपाली लाखे, गुलजार मुल्ला आदींसह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments