टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटनानंतर या उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजाबाबत तक्रारी पुढे आल्या असून या विरोधात आज काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात आले.
टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटनाच्या दुसरेच दिवशी सोशल मीडियावर या उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजाबाबतचे फोटो वायरल झाले. खासदार मंगला अंगडी आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या उदघाटन सोहळ्यानंतर अवघ्या २४ तासातच रस्त्यावर खड्डे पडल्याचे आढळून आले. हा विषय शहरात इतका जोरदार चर्चेत आला कि यानंतर अनेकांनी या कारभाराबाबत ताशेरे ओढण्यास सुरु केले. आता विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न करत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलावर रास्ता रोको केला. निकृष्ट दर्जाच्या कामकाजाचा निषेध करण्यात आला.

यावेळी माजी आमदार रमेश कुडची प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, उदघाटनानंतर २४ तासातच उड्डाणपुलाच्या कामकाजाचे वाभाडे निघाले असून या कामकाजातदेखील ४० टक्के कमिशन सत्ताधाऱ्यांनी काढले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी आज याठिकाणी आंदोलन छेडण्यात येत असून या उड्डाणपुलामुळे जीवितहानी झाल्यास यासाठी सर्वस्वी भाजपचं जबाबदार असेल, असे ते म्हणाले.( )
हातात टोपली, टोपलीत प्रतीकात्मक नोटा, उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामकाजाचे फोटो आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनात माजी आमदार रमेश कुडची, ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, सरचिटणीस प्रदीप जे एम, आयेशा सनदी, मंजुनाथ कांबळे, बसवराज शेगावी, सुनील सुनील हणमन्नवर, इरफान अत्तार आदींचा सहभाग होता.


Recent Comments