Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय युवा महोत्सव ‘इंडिया @2047’चा शानदार प्रारंभ

Share

बेळगावमध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सव-‘इंडिया @2047’चा एका समारंभात शानदार प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आज सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रम पार पडले.

“आमचा वारसा आणि आमचा अभिमान” या घोषवाक्याखाली जिल्हास्तरीय युवा महोत्सव-India@2047 कार्यक्रमाचे आयोजन केंद्र सरकारच्या युवा आणि क्रीडा खाते, नेहरू युवा केंद्र, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खाते, कन्नड आणि संस्कृती विभाग, कर्नाटक राज्य युवा संघटना यांनी केले होते. बेळगाव येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात मंगळवारी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन खासदार मंगल अंगडी यांनी केले. या प्रसंगी बोलताना कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री म्हणाल्या की, अनेक तरुण आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोनवर घालवत आहेत. त्याचे दुष्परिणामच अधिक होत आहेत. म्हणून मोबाईल सोडा आणि तुमच्या भविष्याकडे अधिक लक्ष द्या. ज्यांचा जन्म गरिबीत झाला, पण अनेक कष्ट सहन करूनही मोठे यश संपादन केले असे मान्यवर आज आपल्या व्यासपीठावर आहेत. आजच्या तरुणांनी अशांची प्रेरणा घ्यावी, असा कानमंत्र त्यांनी दिला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पद्मश्री पुरस्कार विजेत्या डॉ. सितव्वा जोडट्टी यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने भविष्याविषयी चांगले ध्येय ठेवण्याचे आवाहन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या मागे गुरु असावा लागतो. तरच आपण काहीतरी महान ध्येय साध्य करू शकतो. विद्यार्थीदशेत मुलांना चांगले शिक्षण, संस्कार मिळाले पाहिजेत. या वयात, जर तुम्ही चांगले शिक्षण घेतले नाही तर काहीही साध्य करू शकणार नाही. सरकार पुरेशा सुविधा देत आहे. त्यांचा वापर लाभ घ्या आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा, असे आवाहन त्यांनी विध्यार्थ्यांना केले.

माहिती व जनसंपर्क खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग जिनेश्‍वर पडनाड, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे, नेहरू युवा केंद्राचे निवृत्त जिल्हा युवा समन्वय अधिकारी एस. यू. जमादार, आर. आर. मुतालिक-देसाई, युवा संघटक मल्लेश चौगुले, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते भारत कलाचंद्र आदी उपस्थित होते. उदघाटन समारंभानंतर विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

Tags: