बेळगावात मी कोणत्याही कारणास्तव रिंगरोड होऊ देणार नाही. एकवेळ सरकारने आग्रह धरला आणि शेतकऱ्यांनी सहमती दर्शवल्यास बाजारभावापेक्षा आठ पट अधिक भाव द्यावा. प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी नोकरी देऊन जमीन संपादित करावी. माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ होणार नाही, असा इशारा ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्य सरकारला दिलाय.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात रिंगरोडच्या कामाला शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाबाबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमच्या इनन्यूज-आपली मराठीसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या, प्रस्तावित रिंगरोडमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत. हा रिंगरोड 25 हून अधिक गावातून जाणार आहे.
आम्हालाही बेळगावचा विकास व्हावा अशी इच्छा आहे. मात्र बेळगाव ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर पुन्हा पुन्हा कुऱ्हाड मारणे कितपत योग्य आहे? याआधीच विमानतळ, व्हीटीयू, कचरा डेपो, एसटीपी प्लांट, सुवर्ण विधानसौध अशा प्रकल्पांसाठी आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची बरीच जमीन गेली आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकऱ्यांवर सरकार वारंवार अन्याय करत आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्र व राज्य सरकार यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना काय दिलासा दिला, असा त्यांनी सवाल केला.
आ. लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, सुवर्णसौधच्या बांधकामासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. ग्रामीण भाग शहराच्या अगदी जवळ आहे जिथे शेतकरी 1, 2 एकर जमिनीवर संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. अनेक लोक कामगार आणि कष्टकरी आहेत. बटाटे आणि रताळी पिकवून ते उदरनिर्वाह करत आहेत. सरकार रोज रात्री येऊन त्यांची शेकडो एकर सुपीक जमीन ताब्यात घेत असेल तर त्यांचे काय होईल, याची मला चिंता वाटते.
या पार्श्वभूमीवर मी कोणत्याही कारणास्तव रिंगरोडचे बांधकाम होऊ देणार नाही. सरकारने आग्रह धरला तर बाजारभावापेक्षा 8 पट अधिक रक्कम द्या. जमीन गमावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी नोकरीची आगाऊ घोषणा करावी. तेही शेतकऱ्यांना मान्य असेल तरच. नाहीतर आपण सगळ्यांच्या पुढे उभे राहू आणि पुढे जाऊ. या प्रश्नी जिद्दीने लढावे लागेल. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
एकंदर, बेळगाव ग्रामीण मतदार संघात रिंगरोडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी गर्जना त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा हा लढा कोणते वळण घेतो हे पहावे लागेल.


Recent Comments