जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच योग्य निर्णय घेऊन लोकांना मदत करावी. समयसूचकतेने आणि परिस्थितीची जाणीव ठेवून वागले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला.
विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बोलताना बोम्मई म्हणाले, जिल्हाधिकारी म्हणून काम करणे ही आयएएस अधिकाऱ्यासाठी खूप महत्त्वाची संधी असते. तुम्ही जिल्ह्यात कामाची छाप कशी सोडता हे महत्त्वाचे आहे. अनेक अधिकारी जिल्हाधिकारी पदामुळे मिळणाऱ्या सत्तेकडे पाहतात. त्यात त्या पदाची जबाबदारी आणि प्रशासनाचा परिणाम लक्षात घेतला जात नाही. पण सत्ता चालवणं वेगळं, आणि सुशासन देणं वेगळं, हे ध्यानात ठेवून काम करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, तुम्ही प्रशासनाचा भाग आहात. तुमच्याकडे शक्तीही जास्त आहे. तुम्ही घेतलेले निर्णय हे राज्यकारभारात खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला कोणतेही काम करायचे नसेल तर 101 कारणे आहेत. चांगले कृत्य करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे. त्यामुळे वेळीच निर्णय घेऊन सुशासन दिले पाहिजे. काही अडचण आल्यास तातडीने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आजच्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडावेत. त्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय निधी वाटपाबाबत शासनाचे आदेश आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी तळागाळात उपाययोजना कराव्यात आणि शेवटी निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली.
मंत्री आर. अशोक, जे. सी. माधुस्वामी, व्ही. सुनीलकुमार, सी. सी. पाटील, व्ही. सोमन्ना, बी. श्रीरामुलू, के. गोपालय्या, सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा आणि शासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments