बेळगावमध्ये रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मण सवदी यांच्या समवेत भाजप प्रभारी अरुण सिंग यांनी स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना प्रश्न विचारले असता अचानक प्रसारमाध्यमांवर ते भडकले आणि कोणत्याही कल्पना न मांडण्याचे सांगत आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

चिकोडी येथील जनसंकल्प मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, १०० जागांवर उमेदवार उभे करून त्यांच्या विजयासाठी आपण परिश्रम घेत आहोत. जेडीएस आणि काँग्रेस ची मक्तेदारी असलेल्या मतदारसंघात देखील आपण विजयी होण्याचा संकल्प केला असू, बेळगाव जिल्ह्यात पाच मतदार संघांचे आपले लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्यावर २५ मतांची जबाबदारी देण्यात आली असून राज्यातील जागांची आकडेवारी ५१ टक्के असेल तर शंभर टक्क्यांच्या समान आणि ४९ टक्के असेल तर शून्याच्या समान असल्याचेही ते म्हणाले.
बेळगावच्या प्रत्येक मतदारसंघात भाजपला विजयी करण्याची जबाबदारी देण्यात आली असून याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना सांगितले, जो घोडा धावेल त्याच्याबाजूनेच आपण लढणार. सध्या यमकनमर्डी, चिक्कोडी, बेळगाव ग्रामीण, खानापुर यासह पाच मतदारसंघात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मण सवदी यांच्यासमवेत अरुण सिंग यांनी घेतलेल्या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अचानक लक्ष्मण सवदी प्रसारमाध्यमांवर भडकले. आपल्यात कोणतेही मतभेद नसून यासंदर्भात आपल्या कल्पना न लढविण्याचा सल्ला त्यांनी दिला. तुम्ही जे म्हणता ते वेदवाक्य नाही. काल अथणीमध्ये दोन सभा झाल्या. यासाठी आपण बेळगावमध्ये उशिरा पोहोचलो. भाजपमधील सर्व नेते एकाच छत्राखाली एका कुटुंबाप्रमाणे राहतात, आणि एकसंघ राहतात असे ते म्हणाले.
यत्नाळांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यासाठी बसवराज यत्नाळ हे इतके मोठे व्यक्तिमत्व नाही. त्यांच्याइतकी बुद्धी आपल्याकडे नाही. ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करतात. यांच्यासंदर्भात चर्चा करण्याइतके आपण समजूतदार नसल्याचा मिश्किल टोला सवदींनी लगावला.
पंचमसाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री चिंतन करून योग्य निर्णय घेतील, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, या मताशी भाजप सहमत असल्याचे लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट केले. ()


Recent Comments