छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा त्यांचा निर्धार याबाबत आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी, या उद्देशाने बेळगावमधील संयुक्त छत्रपती शिवाजी नगर येथील शिवभक्त युवक मंडळातर्फे शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत लहान आणि मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो शिवभक्तांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्तम कामगिरी केली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

सायंकाळी शिवाजी नगर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, नगरसेवक शिवाजीराव मन्नोळकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक हिरामणी मुचंडीकर, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा सेनेचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, महेश तळेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवरायांच्या मूर्तीला पूजा करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी रावसाहेब देसाई यांनी बालशिवाजींच्या पराक्रमाविषयी बालचमूंना माहिती दिली. तसेच आपल्या मुलांना अशा पराक्रमाची माहिती देत आईने प्रत्येक मुलामध्ये देव-देश आणि धर्माची शिकवण द्यावी, असा सल्ला दिला.

हिरामणी मुचंडीकर यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उपस्थित मुलांना सांगितला. सध्याच्या अभ्यासक्रमांना महत्वपूर्ण इतिहास दडविला जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्यासारखे देशभक्त जाणून घेणे आवश्यक असून इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती युवकांना व्हावी, देव-देश-धर्म रक्षणाचा संदेश देण्यासाठी अशा स्पर्धा अधिकाधिक घेण्यात याव्यात, असे मत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी दिलेल्या त्यागाची, त्यांच्या पराक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आयोजित केलेल्या स्पर्धा आयोजकांचे स्पर्धेतील विजेत्या युवतीने आभार मानले.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ५०००, ३०००, २०००, १००० असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशा स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. यावेळी मल्लेश बडमंजी, सुहास पवार, प्रसाद मोरे, राहुल चव्हाण, संतोष निकम, सुहास पवार आदींसह शिवभक्त युवक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.


Recent Comments