2023 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे बेळगाव जिल्ह्यातील भाजपमधील राजकीय हालचालींना वेग येत आहे. याच दरम्यान, प्रदेश भाजपचे प्रभारी अरुण सिंह यांच्या बेळगाव दौऱ्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी घेतलेल्या गुप्त सभेमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

होय, बेळगाव जिल्हा हा राज्यातील भाजपचा बालेकिल्ला आहे. सध्या जिल्ह्यातील 18 पैकी 14 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. केवळ 4 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. अशाप्रकारे 2023 च्या निवडणुकीतही 14 हून अधिक मतदारसंघात आपले आमदार निवडून आणण्यासाठी कमळाबाईने कंबर कसली आहे. मात्र हे सर्व तेव्हाच शक्य होईल, जेव्हा भाजपमधील दुफळीचे राजकारण शांत होईल. अशाप्रकारे जिल्ह्यातील भाजप नेत्यांना एकतेचा मंत्र देण्यासाठी प्रदेश भाजप प्रभारी अरुण सिंह यांनी रविवारी बेळगावला भेट दिली. रविवारी सर्व नेते सुट्टीच्या मूडमध्ये होते. मात्र रविवारी सायंकाळी कर्नाटकचे भाजपचे प्रभारी अरुण सिंह बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये आल्याचे कळताच बेळगाव जिल्ह्यातील जवळपास बिनीच्या सर्वच भाजप नेत्यांनी तेथे गर्दी केली.

सायंकाळी 6 वाजता माजी मंत्री रमेश जारकीहोळी सर्किट हाऊसमध्ये आले. त्यानंतर अरुण सिंह यांनी रमेश जारकीहोळी यांच्याशी सुमारे तासभर गुप्त चर्चा केली, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असताना आमदार अनिल बेनके, महेश कुमठळ्ळी, खासदार मंगल अंगडी, जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, एम. बी. जिरली, उज्वला बडवान्नाचे यांच्यासह भाजपचे अनेक नेते बाहेर प्रतीक्षा बसले होते. रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अरुण सिंग बाहेर आल्यानंतर त्यांनी मंत्री गोविंद कारजोळ यांना आत नेऊन काही वेळ चर्चा करून परत बाहेर आले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण सिंह म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. रमेश जारकीहोळी यांनी पुढची निवडणूक जिंकण्यात म्हत्वाची भूमिका बजावायची आहे. पक्ष त्यांना लवकरच मोठी जबाबदारी देईल. बेळगाव जिल्ह्यासह राज्यात रमेश जारकीहोळी यांचा करिष्मा आहे. निवडणुकीनंतर भाजपला मजबूत करण्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले.

हायव्होल्टेज राजकारणाची आणखी एक फेरी सर्किट हाऊसमध्ये झाली. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हेही सर्किट हाऊसवर पोहोचले आणि त्यांनीही अरुण सिंह यांच्याशी चर्चा केली. ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, अरुणसिंह हे राज्याच्या विविध भागांचा दौरा करण्यासाठी हुबळी येथे आले आहेत. उच्चस्तरीय राजकारणावर चर्चा झाली नाही. महापौर व उपमहापौर निवडीबाबत चर्चा झाली. तांत्रिक समस्या सरकारी पातळीवर चर्चा करून सोडवण्याची गरज आहे. रमेश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील तगडे नेते आहेत. त्यामुळे अरुण सिंग त्यांच्याशी बोलले. पण त्या दोघांत नेमकी काय चर्चा झाली ते मला माहित नाही.
एकंदर अरुण सिंह यांचा बेळगाव दौरा, त्यांनी भाजप नेत्यांशी केलेली गुप्त सल्लामसलत, या सर्व बाबींचे निरीक्षण केल्यास बेळगाव भाजपमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची खातरजमा करण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी अरुण सिंग यांची भेट घेतल्यानंतर बंगळुरूला धाव घेतली, त्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Recent Comments