Belagavi

शास्त्रीय पद्धतीने उसाला दर देण्याची आपची मागणी

Share

उसाला योग्य दर देण्याच्या मागणीचा मुद्दा उचलून धरत गेल्या आठवड्याभरापासून आम आदमी पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आज पुन्हा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.

कर्नाटकातील उसाच्या दराबाबत नेहमीच शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येतो. उसाला शास्त्रीय पद्धतीने दर देण्यात यावा यासाठी आम आदमी पार्टीच्या बेळगाव विभागाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बेळगावमध्ये आंदोलन सुरु केले आहे. उसाला प्रतिकिलोमीटरला येणारा खर्च तसेच सरकारकडून देण्यात येणारा दर यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आप ची सत्ता असलेल्या पंजाब मध्ये रिकव्हरी दर कमी असूनही ३८०० रुपये प्रति मेट्रिक टन दर घोषित करण्यात आला आहे.

मात्र कर्नाटकात शेतकरी संघाने मागणी करूनही कमीतकमी ३५०० रुपये दर देण्यात येत नसल्याबाबत संताप व्यक्त करत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम आदमी पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी उसाला शास्त्रीय पद्धतीने दर देण्यासंदर्भात निवेदनही सादर करण्यात आले.

एक टन उसाच्यामाध्यमातून इथेनॉल, अल्कोहोल, वीज निर्मिती या माध्यमातून साखर कारखान्याला मोठे उत्पन्न मिळते. सरकारला ४५०० रुपये कराच्या माध्यमातून मिळतात. सरकारने २००० रुपये प्रतिटन देण्याची व्यवस्था करावी, या मागणीसह ऊस तोडणीच्या १५ दिवसाच्या आत देयके देण्यात यावीत, केवळ साखर कारखान्यांच्या हिताचा विचार न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात आम आदमी पक्षाच्या उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपण्णावर, शंकर हेगडे, तवाब शेख आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

belgaum-aap-protest-for-sugarcane-fip-rate-fix/