Belagavi

विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला 130 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रम

Share

हिंदू धर्माचा डंका सर्वप्रथम जगभर गाजविणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या बेळगाव भेटीला आज 130 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांनी वास्तव्य केलेल्या रिसालदार गल्लीतील वास्तूत आज विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडला.

भारत भेटीदरम्यान स्वामी विवेकानंद 16 ते 27 ऑक्टोबर 1892 या काळात बेळगावमध्ये राहिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामकृष्ण मिशन आश्रमाच्या वतीने आजपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली.

आताच्या स्वामी विवेकानंद मार्ग आणि पूर्वीच्या रिसालदार गल्लीतील भाटे वाड्यात स्वामी विवेकानंदांनी वास्तव्य केले. सध्या तेथे स्वामी विवेकानंद स्मारक उभे आहे. तेथे आज त्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या 130व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या वास्तव्यादरम्यान वापरलेल्या वस्तू, त्यांनी ज्या खोलीत मुक्काम केला आणि ते ज्या ठिकाणी बसले ते सर्व सुरक्षित ठेवण्यात आले असून या घराचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेला बेड, आरसा आणि लाठीही जतन केली आहे. स्वामीजींच्या जीवनावर आधारित चित्रकृतींचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.

रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी आत्मा प्राणानंद यांनी आज आयोजित कार्यक्रमाची माहिती इन न्यूज-आपली मराठीला दिली, ते म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी जगाला दिलेला संदेश लक्षात घेऊन तरुणांनी जागरूक होऊन सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे.

यावेळी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी कन्नड भजन व मराठी प्रवचनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुण्याचे राष्ट्रीय कलाकार दामोदर रामदासी यांनी ‘योद्धा संन्यासी : स्वामी विवेकानंद’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला.

Tags:

belgaum-swamy-vivekanand-programme/